पोरबंदरच्या पँट्री कारमध्ये गॅस सिलिंडरचा वापर; तपासणीत आढळला धक्कादायक प्रकार

By नरेश डोंगरे | Updated: July 5, 2025 20:23 IST2025-07-05T20:22:44+5:302025-07-05T20:23:29+5:30

Nagpur : आरपीएफकडून एकाला अटक; सहा महिन्यातील पाचवी कारवाई

Gas cylinder used in Porbandar's pantry car; Shocking incident found during inspection | पोरबंदरच्या पँट्री कारमध्ये गॅस सिलिंडरचा वापर; तपासणीत आढळला धक्कादायक प्रकार

Gas cylinder used in Porbandar's pantry car; Shocking incident found during inspection

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
पोरबंदर हावडा एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कार (किचन)मध्ये खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी चक्क प्रतिबंधित गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने या प्रकरणी एकाला रंगेहात पकडले आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये पेट्रोल, डिजेल, रॉकेल स्टोव्ह, सिलिंडर, फटाके अथवा अशाच दुसऱ्या ज्वलनशिल आणि स्फोटक पदार्थांमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कारण यातून पुढे आलेल्या भयावह दुष्परिणामांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये कोणत्याच प्रकारचे विस्फोटक अथवा ज्वलनशिल पदार्थ नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांच्या किचनमध्येही सिलिंडरचा वापर करण्यासही मनाई आहे. तरीसुद्धा अनेक जण लपून छपून ज्वलनशिल, स्फोटक पदार्थांची ने-आण करतात. काही गाड्यांचे पॅन्ट्री मॅनेजर तसेच स्टाफ खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सिलिंडरचाही अवैधपणे वापर करतात. त्याला रोखण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे महानिरीक्षक मुन्नवर खुर्शिद तसेच सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आरपीएफच्या ठिकठिकाणच्या स्टाफला गाड्यांची कसून तपासणी करण्याचे तसेच कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी, ४ जुलैला आरपीएफच्या गुन्हे गुप्तचर शाखेचे पथक ट्रेन नंबर १२९०५ पोरबंदर हावडा एक्सप्रेसमध्ये तपासणी करीत होते. पॅन्ट्री कारची तपासणी करताना तेथे एक व्यक्ती प्रतिबंधित गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्य पदार्थ तयार करीत असल्याचे दिसून आले. त्याला आरपीएफच्या पथकाने ताबडतोब प्रतिबंध करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून त्याचे ओळखपत्र जप्त करून त्याला राजनांदगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या हवाली करण्यात आले.

सहा महिन्यातील पाचवी कारवाई

रेल्वे गाड्यांमध्ये आग लागू नये, स्फोट होऊ नये यासाठी स्फोटके आणि ज्वलनशिल पदार्थांच्या वाहतूकीवर, वापरावर कडक बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखिल अनेक जण या बंदीला जुमानत नाही. यावर्षी आतापर्यंत फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या एकाला तर सिलिंडरचा वापर करणाऱ्या चार जणांना आरपीएफने अटक करून कोठडीत टाकले आहे.

प्रवाशांना आवाहन
रेल्वे गाडीतील आगीचे भयंकर दुष्परिणाम होतात. निरपराध प्रवाशांना त्याची किंमत चुकवावी लागते. त्यामुळे कुणीही रेल्वे गाडीत स्फोटक अथवा ज्वलनशिल पदार्थांची वाहतूक करू नये. कुणी वाहतूक करताना आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिस, आरपीएफ किंवा रेल्वेच्या हेल्पलाईनवर माहिती द्यावी, असे आवाहन आरपीएफने केले आहे.

Web Title: Gas cylinder used in Porbandar's pantry car; Shocking incident found during inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.