ओडिशातून येतो गांजा, एमपी, छत्तीसगडमधून बनावट दारू ! ड्रग्स माफियांकडून तस्करीसाठी रेल्वेचा वापर
By नरेश डोंगरे | Updated: January 2, 2026 18:49 IST2026-01-02T18:47:43+5:302026-01-02T18:49:23+5:30
Nagpur : खासगी वाहनातून अमली पदार्थांची तस्करी करणे धोक्याचे झाल्यामुळे विविध प्रांतातील ड्रग्स माफियांनी तस्करीसाठी रेल्वेचा बिनबोभाट वापर चालविला आहे.

Ganja comes from Odisha, fake liquor from MP, Chhattisgarh! Drug mafia uses railways for smuggling
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी वाहनातून अमली पदार्थांचीतस्करी करणे धोक्याचे झाल्यामुळे विविध प्रांतातील ड्रग्स माफियांनी तस्करीसाठी रेल्वेचा बिनबोभाट वापर चालविला आहे. रेल्वे सुरक्षा दला (आरपीएफ)कडून या संबंधाने वर्षभरात कारवाया झाल्या असल्या, तरी हे प्रमाण फारच कमी असल्याची बाब आता चर्चेला आली आहे.
आधी महाराष्ट्रात तेलंगणा, आंध्र प्रदेशातून ट्रक, कंटेनरमधून गांजाची खेप यायची. गेल्या काही वर्षांत 'तिकडच्या आणि इकडच्या पोलिसांनी' कडक कारवाईचा पवित्रा घेतल्याने तीन-चार वर्षांपासून गांजा तस्करांनी आता आपले डेस्टिनेशन बदलविले. ओडिशातील संभलपूर परिसरातून गांजा तस्करीचा मोठा गोरखधंदा चालतो. तेथील गांजा माफिया गरीब कुटुंबातील महिला, पुरुष आणि मुलांना प्रति खेप दोन ते तीन हजार रुपये देऊन कोलकात्याहून रेल्वेत बसवून देतात. तिकडे सर्व 'सेट' असल्याने आणि पकडले जाण्याचा धोका नसल्याने ही मंडळी रेल्वेने निघतात. हा गांजा नागपूरला आल्यानंतर येथून बटवारा होतो. काही गांजा इटारसी, भोपाळ आणि पुढे आगरा, दिल्लीकडे जातो. तर, गांजाची काही बंडले नागपूर, वर्धा मार्गे चक्क मराठवाडा आणि मुंबईपर्यंत पोहचतात.
अशाच प्रकारे छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दारूची निर्मिती करण्यात येते. तशा प्रकारच्या अनेक 'लिकर फॅक्टरी' महाराष्ट्र आणि छत्तीसगड, तसेच मध्य प्रदेशच्या सीमांवर आहेत. ब्रांडेड नावाने तयार केली जाणारी ही दारू बनावट असली, तरी ती बाह्य दर्शनी ओरिजनलच वाटते. ती महाराष्ट्रातील दारू विक्रेत्यांना खूपच स्वस्त दरात मिळते. वेगवेगळ्या महामार्गांवरच्या हॉटेल, ढाब्यांवर ती मोठ्या प्रमाणात विकली जाते. खासगी वाहनांनी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात दारू नेणे धोक्याचे असते. ठिकठिकाणी तपासणी होत असल्याने दारूची खेप पकडली जाण्याचा धोका असतो. त्यामुळे तस्कर दारूचे बॉक्स रेल्वेच्या डब्यात बर्थ खाली ठेवून देतात आणि दुरून त्यावर लक्ष ठेवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही खेप पोहचवतात.
३३ वेळा गांजा अन् ८५ वेळा पकडली दारू
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गेल्या वर्षांत ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ३३ वेळा कारवाई करून ५९ लाख, २६ हजार, २१५ रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. २१ आरोपींना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ऑपरेशन लिकर अंतर्गत रेल्वेत दारूची ८५ प्रकरणे दाखल झाली. याअंतर्गत ३५ आरोपींना अटक करून १५ लाख, ४१ हजार, ९१० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. नमूद आकडेवारीतून रेल्वेतून अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे स्पष्ट होत असले, तरी कारवाईचे आकडे फारच छोटे असल्याचीही संबंधितांची माहिती आहे.