फरार ठगबाजाने अनेकांना लावला कोट्यवधीचा चुुना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:44 AM2021-03-08T02:44:08+5:302021-03-08T02:44:43+5:30

कुख्यात सुभाष बंजाराचे नवीन कृत्य : २ हजार टॅक्सी मालकांना गंडा

Fugitive swindlers slapped many with crores of rupees | फरार ठगबाजाने अनेकांना लावला कोट्यवधीचा चुुना

फरार ठगबाजाने अनेकांना लावला कोट्यवधीचा चुुना

Next

जगदीश जोशी

नागपूर : टॅक्सी भाड्यावर चालवण्याचे आमिष दाखवून नागपुरात अनेकांची फसवणूक करून फरार झालेल्या सुभाष बंजाराने दिल्लीतही जवळपास दोन हजार टॅक्सी मालकांना कोट्यवधीचा चुना लावला आहे. फसवणुकीच्या प्रकरणात साडेपाच महिन्यांपासून फरार असूनही पोलीस त्याला शोधण्यासाठी कुठलाही प्रयत्न करताना दिसत नाहीत. यामुळेच बंजारा चार महिन्यांतच दिल्लीतूनही कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाला. हा प्रकार उघडकीस येताच शहरातील पीडितही संताप व्यक्त करत आहेत.

बंजारपा मूळचा जळगावचा आहे. त्याने कोरोना संसर्गादरम्यान एलआयसी चौकाजवळ कुक टॅक्सी ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली होती. टॅक्सी मालकांना त्याच्याशी जुळल्यास टॅक्सीच्या मोबदल्यात दर महिन्याला एक ठरावीक रक्कम देण्याचे आमिष दाखविले होते. रजिस्ट्रेशनच्या नावावर शहरात ७५०० आणि शहराबाहेरसाठी १७,५०० रुपये घेतले होते. जुलैमध्ये टॅक्सी सर्व्हिस सुरू केली. ऑगस्टमध्ये रोख रक्कम अदा केली; परंतु सप्टेंबरमध्ये धनादेश दिले. त्यानंतर ते धनादेश बाऊन्स झाल्यावर तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिनेश मिश्रा यांच्या तक्रारीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सूत्रानुसार तपासात जवळपास ४५० टॅक्सी मालकांकडून ४.२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी २५० पेक्षा अधिक लोकांची साक्षही नोंदवून घेतली.

नागपुरातून फरार झाल्यानंतर बंजारा मुंबई मार्गे दिल्लीत पोहोचला. दिल्लीच्या वजीरपूर येथे नेताजी सुभाष पॅलेस येथे त्याने योयो टॅक्सी सर्व्हिस सुरू केली. तिथेही त्याने नागपूरच्या धर्तीवर टॅक्सी मालकांना आपल्या जाळ्यात अडकविले. डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत २ हजार टॅक्सी मालक बंजाराच्या योयो सर्व्हिसशी जुळले. त्याने ६५ ते ३५ हजार रुपये रजिस्ट्रेशनच्या नावावर घेतले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच तो लोकांचे पैसे घेऊन फरार झाला. टॅक्सी मालकांनी वजीरपूर ठाण्यात, डीसीपी आणि ईडीकडे त्याची तक्रार केली. 

पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह   
बंजारा नागपुरातील एका पीडित टॅक्सी मालकाची कार घेऊन फरार झाला होता. त्या कारला ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत दंड झाला. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी दिल्लीतील काश्मिरी गेट, ८ डिसेंबर रोजी वजिराबाद आणि १३ जानेवारी २०२१ रोजी कॅम्प चौक येथे दंड झाला. कार मालकास मोबाइलवर ई-चालान झाल्याचा एसएमएस आला. त्याने लगेच सदर पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा आरोपीला सहजपणे शोधता आले असते; परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Fugitive swindlers slapped many with crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.