माजी गृहमंत्र्यांचे पूत्र सलील देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम
By कमलेश वानखेडे | Updated: November 20, 2025 20:13 IST2025-11-20T20:12:15+5:302025-11-20T20:13:48+5:30
Nagpur : प्रकृती अस्वास्थाचे दिले कारण, प्रत्यक्षात काटोलात शेकापला पाठिंब्यावरून वडिलांवरच नाराज, अजित पवारांकडे जाण्याची शक्यता, सहा महिन्यात निर्णय घेणार

Former Home Minister's son Salil Deshmukh says goodbye to Sharad Pawar's NCP
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धामधुमीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार )पक्षाचा गुरुवारी राजीनामा दिला. अनिल देशमुख हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. पण त्यांच्या पुत्राने राजीनामा देत शरद पवारांनाच धक्का दिला. सलील यांनी राजीनाम्यामागे प्रकृती अस्वास्थाचे कारण दिले. पण प्रत्यक्षात काटोलात नगराध्यक्षपदासाठी शेकापला पाठिंबा दिल्यामुळे वडिलांवरील नाराजीतून त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख यांनी लढावे की सलील देशमुख यांनी यावरून बराच कात्थ्याकुट झाला होता. ऐनवेळी सलील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी शेकापचे राहुल देशमुख यांनी विरोधात निवडणूक लढविली. राहुल देशमुख यांच्या मतविभाजनाचा फटका काहिअंशी सलील यांना बसला. भाजपचे आ. चरणसिंग ठाकूर विजयी झाले. असे असतानाही अनिल देशमुख यांनी काटोल नगर परिषदेत शेकापशी आघाडी करीत राहुल देशमुख यांच्या पत्नी अर्चना यांना नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिले. ही बाब सलील यांना खटकली व त्यांनी पक्ष सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे.
रुग्णालयात अजित पवारांनी घेतली होती भेट
दोन महिन्यापूर्वी सलील देशमुख यांची प्रकृती खालावली होती. ते नागपुरातील रुग्णालयात भरती असताना उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सलील यांचे अजित पवार यांच्याशी ऋणाबंध कायम असल्याचे स्पष्ट झाले होते. सलील यांनी राजीनामा देताना कोणत्या पक्षात जाणार नाही, सहा महिन्यात निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. मात्र, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
नरखेड, मोवाड, कोंढाळीत परिणाम
नरखेड, मोवाड व कोंढाळी येथे राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. काटोलमध्ये नगरसेवक पदासाठीही उमेदवार लढत आहे. ऐन निवडणुकीत सलील देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्याचा परिणाम या ठिकाणी पडू शकतो.