फटाके बाजारात महागाईचा धमाका, किमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 05:54 PM2021-10-31T17:54:57+5:302021-10-31T17:55:27+5:30

फटाके तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व ट्रान्स्पोर्ट महागल्याने फटाक्यांच्या किमतीत जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

firecracker rate increased in the occasion of diwali | फटाके बाजारात महागाईचा धमाका, किमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ

फटाके बाजारात महागाईचा धमाका, किमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे७५ रुपयांच्या सुतळी बॉम्बचे पॅकेट गेले १०० रुपयांवर

नागपूर : दिवाळीचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे; परंतु फटाके तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व ट्रान्स्पोर्ट महागल्याने फटाक्यांच्या किमतीत जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत या महागाईचा विक्रीवर फारसा प्रभाव पडणार नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दिवाळीच्या काळात राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होते. मात्र, मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने नुकताच कोरोनामुक्त झालेल्यांना त्रास होण्याची भीती, फटाके विरुद्ध पर्यावरणप्रेमींची जनजागृती, दरांत वाढ व फार कमी किरकोळ दुकानांना मिळालेली मंजुरी, आदी कारणांमुळे फटाक्यांच्या विक्रीवर प्रभाव पडला होता. परंतु आता कोरोना आटोक्यात आल्याने व सर्व व्यवहार हळूहळू खुले झाल्याने तसेच लोकांमध्ये उत्साह असल्याने फटाक्यांच्याही विक्रीला गती आली आहे.

कच्चा माल, ट्रान्स्पोर्ट महागले

ठोक विक्रेत्यांनी सांगितले, फटाकेनिर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, अल्युमिनिअम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्च्या मालाची आवश्यकता असते. यंदा या सर्व कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यात डिझेल महागल्याने ट्रान्स्पोर्टच्या किमतीही वाढल्या. यामुळे मागील वर्षी ७५ रुपयांच्या सुतळी बॉम्बचे पॅकेट या वर्षी १०० रुपये, मागील वर्षी असलेला २६ रुपये फुलझडीच्या पॅकेटचा दर या वर्षी ४० रुपयांवर, तर मागील वर्षी ५५ रुपयांचे भुईचक्राचे पॅकेट ७४ रुपयांवर गेले आहे.

५०० वर दुकानांना मंजुरी

या वर्षी शहरातील ९ अग्निशमन केंद्रांतून ५००वर फटाक्यांच्या किरकोळ व्यावसायिकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. दुकाने अस्थायी असली तरी अग्निशमन विभागाची परवानगी लागते. अग्निशमन विभागाद्वारे प्रमाणपत्राचे व पर्यावरण शुल्क आकारण्यात येते. त्यानंतरच पोलीस विभागाकडून अंतिम मंजुरी व परवाना दिला जातो. १० ते १५ दिवसांसाठी दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

ग्रीन फटाक्यांमुळे ग्राहकांमध्ये उत्साह

कोरोनाची दहशत कमी झाली आहे; यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय, ग्रीन फटाके बाजारात आल्याने त्यांना चांगली मागणी आहे. फटाक्यांच्या किमतीत वाढ झाली असली तरी याचा विक्रीवर परिणाम होणार नसल्याचे दिसून येत आहे.

-प्लास्टिकच्या बंदुकीतही १५ टक्क्यांनी वाढ

टिकल्या व रोल फोडण्यासाठी खेळण्यांतील प्लास्टिकच्या बंदुकीतही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे; परंतु यावर्षी बंदुकीत खूप नवीन सारे प्रकार आले आहेत. यात माचीस गन, बुलेट गन, स्टेनगन, मशीनगन, आदी प्रकार आहेत.

Web Title: firecracker rate increased in the occasion of diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.