प्रेमात पडली, घरदार सोडले, जिवाची मुंबई करायला जाताना नागपूरमध्ये पकडले

By नरेश डोंगरे | Updated: July 3, 2025 19:21 IST2025-07-03T19:21:05+5:302025-07-03T19:21:43+5:30

नवऱ्याला ठेंगा, दोन मुलांकडेही पाठ : आंध्र प्रदेशातील जोडप्यांना नाट्यमयरित्या अटक

Fell in love, left home, caught in Nagpur while going to Mumbai to save her life | प्रेमात पडली, घरदार सोडले, जिवाची मुंबई करायला जाताना नागपूरमध्ये पकडले

Fell in love, left home, caught in Nagpur while going to Mumbai to save her life

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
१० वर्षांचा संसार अन् सोन्यासारख्या दोन मुलांकडे पाठ फिरवून आंध्र प्रदेशातील एका महिलेने प्रियकराचा हात धरला. जिवाची मुंबई करण्यासाठी हे दोघे आंध्र प्रदेशातून मायानगरीकडे निघाले. मात्र, नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांना ट्रेस करून रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) त्यांचे पलायन नाट्य उधळले.

विवाह्यबाह्य संबंधातून पुढे आलेल्या या घटनेतील चमेली (वय ३२, नाव काल्पनिक) आंध्र प्रदेशातील काकीनाडा जवळची रहिवासी आहे. तिच्या लग्नाला १० वर्षे झाली असून तिला दोन मुले आहेत. ती शिक्षिका होती. मात्र, चांगला जॉब करणाऱ्या नवऱ्याने घरी पुरेसा वेळ देत नसल्यामुळे तिला जॉब सोडण्यास सांगितले. त्यानंतर घरातल्या घरात राहावे लागते. मनासारखे मोकळेपणाने बाहेर फिरता येत नसल्याने ती घुसमट होत असल्याचे सांगायची. यावरून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे. दरम्यान, याच गावात राहणाऱ्या ४२ वर्षीय चमनलाल (नाव काल्पनिक) सोबत तिचे सूत जुळले. तो खासगी जॉब करतो. 'छूप-छुपके' भेटावे लागते, मनासारखा वेळ एकमेकांना देता येत नसल्याची दोघांची भावना झाल्याने त्यांनी आंध्र सोडून मायानगरी मुंबईत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ट्रेन नंबर १८०३० एलटीटी मुंबई एक्स्प्रेसची तिकिटे काढून १ जुलैला या दोघांनी गावातून पळ काढला. ते लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी गाडीचा रूट लक्षात घेत नागपूर आरपीएफला दोघांची सचित्र माहिती देऊन त्यांना ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यानुसार, नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच आरपीएफचे निरीक्षक अश्विनी कुमार, सत्येंद्र यादव, उपनिरीक्षक प्रियंका सिंग, ईश्वर राव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 'ऑपरेशन रेल प्रहरी' राबवून ट्रेनच्या कोच नंबर ए-२ मधून या महिलेसोबत तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.
 

नवऱ्याशी पटत नाही म्हणून...
विवाहबाह्य प्रेमसंबंधातून घरून पळून जात असल्याची कबुली या दोघांनी प्राथमिक चाैकशीत दिली. नवऱ्याशी पटत नाही म्हणून घर सोडल्याचे चमेलीने सांगितले. पोलिसांनी दोन मुलांच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित करून तिचे समुपदेशन केले.

अखेर घरवापसी !
हे दोघे गवसल्याचे आणि ते आपल्या ताब्यात असल्याची माहिती नागपूर आरपीएफने आंध्र प्रदेश पोलिसांना कळविली. त्यानुसार, काकीनाडा पोलिस या दोघांच्या कुटुंबीयांसह नागपुरात पोहचले. कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून या दोघांना बुधवारी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे बुधवारी या दोघांची घरवापसी झाली.
 

Web Title: Fell in love, left home, caught in Nagpur while going to Mumbai to save her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.