वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:10 IST2025-10-31T19:08:09+5:302025-10-31T19:10:53+5:30
Nagpur : आयुष्याच्या सर्वात कठीण क्षणीही हार न मानणाऱ्या प्रगती जगतापने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे.

Father passed away, I myself was admitted to ICU... Still, the dream was fulfilled! Nagpur's progress in the state service exam came first among the Scheduled Castes in the state
नागपूर : आयुष्याच्या सर्वात कठीण क्षणीही हार न मानणाऱ्या प्रगती जगतापने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे. राज्यसेवेची पूर्व परीक्षा असतानाच वडिलांचे अचानक निधन झाले. या धक्क्याने त्या नैराश्यात गेल्या होत्या, त्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने त्रास वाढला होता. पण स्वतःला सावरत, पुन्हा नव्या जोमाने अभ्यास सुरू करून त्यांनी हे यश संपादन केले आहे.
कठीण काळात परीक्षा कालावधी
प्रगतीच्या वडिलांचे नाव सुनील जगताप, परीक्षेच्या तोंडावरच ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. ते अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पण त्यांच्या अकाली निधनाने प्रगतीला मोठा आघात सहन करावा लागला. त्या काळात ती मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती.
कारकीर्द व तयारीचा प्रवास
प्रगतीने २०१८ ते २०२२ दरम्यान कृषीसेवक म्हणून काम केले होते. नंतर त्यांनी राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. २०२३ मध्ये त्यांची उपविभागीय आयुक्त म्हणून निवड झाली होती. कळमेश्वर येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाल्या. राज्यसेवेचा अभ्यास चालू ठेवला. यावर्षी मुख्य परीक्षा २७ ते २९ मे यादरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर वैयक्तिक मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत झाल्या आणि निकाल रात्री जाहीर झाला.
यशाचे महत्त्व
प्रगतीने सामाजिकदृष्ट्या मागासवर्गातील (SC) गटातून येऊन उच्च स्थान मिळविले आहे. हे यश अनेक बाबींमध्ये महत्त्वाचे ठरते. हे तिच्या कठीण परिश्रमांचा प्रतिफळ आहे. प्रगतीला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिकेत सहाय्यक आयुक्त पद मिळू शकते. पुढे तिला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हायचे आहेत आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू राहतील.
तिच्या या यशाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. प्रगतीचे हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय समाजघटकातील विद्यार्थ्यांसाठी.