यू-ट्यूब व इन्स्टाग्रामचा वापर करून माजी सैनिकाने घेरले ११ तरुणांना; सरकारी नोकरी लावून देण्याची हमी देत उकळले लाखो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:43 IST2025-10-17T20:42:45+5:302025-10-17T20:43:07+5:30
कुही तालुक्यातील घटना, आरोपीस अटक : ३४ लाख ६० हजार रुपये घेत केली फसवणूक

Ex-soldier lures 11 youths using YouTube and Instagram; embezzles lakhs by promising them government jobs
लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : नोकरी लावून देण्याची बतावणी करीत एका माजी सैनिकाने तब्बल ११ तरुणांकडून एकूण ३४ लाख ६० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे कुही पोलिसांनी त्या आरोपी माजी सैनिकास बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेत अटक केली आहे.
पुरुषोत्तम ज्ञानदेव बिलेवार (४२, रा. सैनिक कॉलनी, शेगाव, जिल्हा बुलढाणा) असे अटक करण्यात आलल्या आरोपीचे नाव आहे. पुरुषोत्तम हा काही काळ भारतीय सैन्यात सैनिकपदी नोकरीला होता. त्याने अलीकडे सोशल मीडियावर माहिती पोस्ट करून काही तरुणांना स्वतःकडे आकर्षित केले होते. त्याच्या पोस्ट आणि पद यावर विश्वास ठेवत कुही तालुक्यातील काही तरुणांनी त्याच्याशी संपर्क साधला. त्याने तरुणांना नोकरी लावून देण्याची बतावणी केली आणि पैशाची मागणी केली. दरम्यान, ११ तरुणांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला टप्प्याटप्प्याने ३४ लाख ६० रुपये दिले.
यातील एका तरुणाने त्याला १४ लाख ६० हजार रुपये देऊनही त्याने नोकरी लावून न दिल्याने दिलेली रक्कम परत मागायला सुरुवात केली. तो रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने तरुणाने कुही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याअनुषंगाने कुही पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम ३१८ (२), ३१८ (४) अन्वये गुन्हा नोंदवून प्रकरण तपासात घेतले. त्याने एकूण ११ तरुणांची ३४ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याला शेगाव येथून ताब्यात घेत अटक केली.
सोशल मीडयाचा वापर
बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी पुरुषोत्तम बिलेवार याने यू-ट्यूब व इन्स्टाग्रामचा वापर केला. कुही पोलिसांना याबाबत १५ सप्टेंबर रोजी तक्रार प्राप्त झाली होती. पोलिसांनी आधी या प्रकरणाच्या सर्व बाजू काळजीपूर्वक तपासून बघितल्या. तांत्रिक पुरावे प्राप्त होताच त्याला अटक केली. विशेष म्हणजे, पुरुषोत्तमला ज्यांची पैसे दिले, ते सर्व जण एकमेकांचे मित्र आहेत. पोलिसांनी त्याच्या शेगाव येथील घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात नोटा मोजण्याची मशीन आढळून आली. यावरून त्याने यापूर्वी कित्येकांची फसवणूक केल्याचेही स्पष्ट होते. पोलिसांनी ती मशीन जप्त केली आहे.