अभियंत्याकडून तरुणीवर अत्याचार, डॉक्टर भावाकडून धमकी व मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 17:53 IST2023-02-24T17:52:55+5:302023-02-24T17:53:15+5:30
नंदनवन परिसरातील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अभियंत्याकडून तरुणीवर अत्याचार, डॉक्टर भावाकडून धमकी व मारहाण
नागपूर : प्रेमाच्या आणाभाका घेत एका अभियंत्याने एका तरुणीवर शारीरिक अत्याचार केले. तरुणीने लग्नाचा आग्रह धरला असता अभियंत्याच्या डॉक्टर भावाकडून तिला धमकी देण्यात आली व मारहाणदेखील करण्यात आली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
कुणाल गुलाब पैड़लवार (३४, गुरुदेवनगर, नंदनवन) असे आरोपीचे नाव असून त्याो भाऊ सुमित (३२) व वैभव पैडलवार (३८) हे सहआरोपी आहेत. कुणालची नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २७ वर्षीय तरुणीसोबत कॉलेजमध्ये ओळख झाली होती. दोघांचीही एकमेकांसोबत मैत्री होती. २ फेब्रुवारी २०२० ते ५ ऑक्टोबर २०२२ दरम्यान कुणालने तरुणीला विश्वासात घेतले व तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकले. मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर आपण लग्न करू असे त्याने तिला आमिष दाखविले व तिच्या खोलीवर जाऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.
हे प्रेमप्रकरण घरी माहिती झाल्यावर कुणालने तरुणीला घरी बोलविले व आईशी बोलण्यास सांगितले. तरुणी त्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या घरी गेली असता त्याचे भाऊ सुमित व वैभव यांनी तिला अश्लील शिवीगाळ केली. त्याच्याशी लग्नाचा विचार सोडून दे व तुला जे करायचे ते कर, असे म्हणत तिला मारहाण केली. तसेच तिचा विनयभंगदेखील केला. त्यानंतर त्यांनी तिला घरातून हाकलून दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.