Energy Minister Nitin Raut statement against Brahmin, lodged fir | ब्राह्मणविरोधी वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊतांना भोवणार, पोलिसांत तक्रार

ब्राह्मणविरोधी वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊतांना भोवणार, पोलिसांत तक्रार

ठळक मुद्देनितीन राऊत यांनी ब्राह्मण समाजाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध यावेळी धर्मपाल मेश्राम यांनी नोंदविला. नितीन राऊत यांच्याविरोधात ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. 

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे (महानगर) अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. 

नितीन राऊत यांनी ब्राह्मण समाजाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध यावेळी धर्मपाल मेश्राम यांनी नोंदविला. संविधानाची शपथ घेऊन आलेल्या मंत्र्यांकडून असे वक्तव्य अपेक्षित नाही. नितीन राऊत यांचे वक्तव्य ही काँग्रेसची भूमिका समजावी काय, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांकडे आपण नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही  धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपूर्वी नागरिकत्व संशोधन कायदा करून आम्हाला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे मागितल्या जात आहेत. जे स्वत: परदेशातून आले ते बामन आम्हाला अक्कल शिकविणार काय ? असे वक्तव्य नितीन राऊत यांनी नागपुरातील सभेत केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि नितीन राऊत यांच्याविरोधात ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, नितीन राऊत यांनी एकतर समाजाची जाहीर माफी मागावी किंवा त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण सेनेतर्फे शनिवारी पत्रपरिषदेत करण्यात आली होती. 


 

Web Title: Energy Minister Nitin Raut statement against Brahmin, lodged fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.