नागपूरमध्ये ९ जागांवरील निवडणुका पुढे ढकलल्या ; चूक कुणाची, भोवली कुणाला ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 19:33 IST2025-12-01T19:31:52+5:302025-12-01T19:33:42+5:30
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील नरखेड, कामठी, रामटेक नगरपरिषद तसेच कोंढाळी नगरपंचायत क्षेत्रातील ९ जागांवरील नगरसेवकपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

Elections in 9 seats in Nagpur postponed; Whose fault is it, who was fooled?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर जिल्ह्यातील नरखेड, कामठी, रामटेक नगरपरिषद तसेच कोंढाळी नगरपंचायत क्षेत्रातील ९ जागांवरील नगरसेवकपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. येथे छाननीदरम्यान उमेदवारी अर्ज बाद झाल्याने हा विषय न्यायालयात पोहोचला होता. यात कामठी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० (अ), प्रभाग क्रमांक ११ (ब), प्रभाग क्रमांक १७ (ब), रामटेक नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक ६ (अ), नरखेड नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २ (ब), प्रभाग क्रमांक ५ (ब), प्रभाग क्रमांक ७ (अ) तसेच कोंढाळी नगरपंचायत येथील प्रभाग क्रमांक ८ आणि प्रभाग क्रमांक १६ येथे निवडणुका होणार नाहीत. येथे नव्याने निवडणूक येईल.
प्रक्रिया राबविण्यात कामठीच्या प्रभाग क्रमांक १० (अ) मधील काँग्रेसचे उमेदवार फातिमा कौसर जमील अहमद यांच्या उमेदवारी अर्जाविरोधात राष्ट्रवादीचे सिद्धार्थ रंगारी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जात प्रमाणपत्राबाबत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २५ नोव्हेंबर रोजी रंगारी यांची याचिका फेटाळून लावत त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला होता. प्रभाग क्रमांक ११ (ब) मधून काँग्रेसचे उमेदवार काशिनाथ प्रधान यांच्या विरोधात लक्ष्मण संगेवार यांनी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रधान यांनी शपथपत्रात गुन्हेगारी व इतर माहिती लपविल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला होता.
न्यायालयाने २६ नोव्हेंबर रोजी याचिका खारीज करून काँग्रेसचे काशिनाथ प्रधान यांच्या उमेदवारी अर्ज स्वीकृत करण्याचे आदेश दिले होते. प्रभाग क्रमांक १७ (ब) मध्ये काँग्रेसचे उमेदवार जोगेंद्र बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज सोबत शपथपत्रात गुन्हेगारी व संपत्तीची माहिती लपविल्याबद्दल त्यांचे विरोधात अपक्ष उमेदवार आकाश भोकरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जोगेंद्र बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा आदेश कामठीचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांना दिला होता. बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज २६ रोजी रद्द करण्यात आला होता. येथे तिन्ही प्रभागांतून न्यायालयीन याचिकेच्या निकालावरून तिन्ही प्रभागांतील उमेदवारांना उमेदवारी अर्ज वापस घेण्याकरिता तीन दिवस अवधी देणे आवश्यक असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप केले. त्यामुळे येथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
नरखेड येथे उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक २ (ब) मधील नगरविकास आघाडी, काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व शिंदेसेना आघाडीच्या उमेदवार अफशिन शोएब शेख प्रभाग क्रमांक ५ (ब) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) दीपक चैतराम नारनवरे व प्रभाग क्रमांक ७ (अ) मध्ये काँग्रेसच्या उमेदवार भावना राजेश कराळे यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले होते. अफशिन शोएब शेख यांचे नामांकन अर्ज टायपिंगच्या चुकीमुळे सदस्य ऐवजी नगराध्यक्षपदाकरिता वर्गीकृत झाला होता. छाननीदरम्यान तो नगराध्यक्षपदाकरिता बाद करण्यात आला होता. त्या निर्णयाविरुद्ध शेख यांनी सत्र न्यायालयात धाव घेत सदर नामांकन अर्ज सदस्य पदाकरिता ग्राह्य धरण्यात यावा अशी विनंती केली होती. न्यायालयाने शेख यांचा अर्ज फेटाळला होता. त्याच्या निर्णयाची प्रत २३ नोव्हेंबरनंतर मिळाली होती.
प्रभाग क्रमांक ५ (ब) मध्ये दीपक चैतराम नारनवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांनी छाननीवेळी आक्षेप घेत नारनवरे हे नगरपरिषदेत संगणक दुरुस्तीचे काम करतात, त्यामुळे ते 'हितसंबंधांतील संघर्ष' या निकषावर अपात्र ठरतात, असा दावा केला होता. तो दावा ग्राह्य धरून नारनवरे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. त्या विरोधात नारनवरे सत्र न्यायालयात गेले होते. न्यायालयानेही त्यांची विनंती अमान्य केली होती.
प्रभाग क्र ७ (अ) मध्ये भावना राजेश कराळे यांनी उमेदवारी अर्जासोबत जातीचा दाखला तसेच जातपडताळणी प्रमाणपत्र न जोडल्याने कराळे यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यांनीही सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कराळे यांची विंनती मान्य करून त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला होता. वरील तिन्ही प्रकारणाचे निकाल हे २३ नोव्हेंबरनंतर प्राप्त झाले. त्यामुळे येथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे.
कोंढाळी नगरपंचायतीत उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान प्रभाग क्रमांक १६ च्या काँग्रेसच्या उमेदवार पूजा मानकर व प्रभाग क्रमांक ८ च्या उमेदवार उमेद्वार आबिदा गफ्फर शाह यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्याविरुद्ध त्यांनी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. हे अपील न्यायालयाने खारीज केले पण निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या दोन प्रभागातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज परत घेण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही म्हणून निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. रामटेक येथे प्रभाग क्रमांक ६ (अ) ची निवडणूक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.