थकबाकी वसुलीत नागपूर मनपाचा कर विभाग थकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 21:52 IST2018-10-09T21:51:42+5:302018-10-09T21:52:23+5:30
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी सात महिन्यानंतरथकबाकी वसुलीने अद्याप जोर पकडलेला नाही. तर चालू वित्त वर्षात ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापासून ८४ कोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत ७३ कोटींची वसुली झाली होती. ३२० कोटींच्या थकीत मालमत्ता करापैकी जेमतेम ११ कोटींचीच वसुली झाली आहे.

थकबाकी वसुलीत नागपूर मनपाचा कर विभाग थकला!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी सात महिन्यानंतरथकबाकी वसुलीने अद्याप जोर पकडलेला नाही. तर चालू वित्त वर्षात ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापासून ८४ कोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत ७३ कोटींची वसुली झाली होती. ३२० कोटींच्या थकीत मालमत्ता करापैकी जेमतेम ११ कोटींचीच वसुली झाली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. यात विभागाने दिलेल्या माहितीनुसार ५ लाख ६० हजार मालमत्तांपैकी ३ लाख २० हजार डिमांड वाटप करण्यात आले. दोन लाख ७० हजार मालमत्ताधारकांना अद्याप डिमांड मिळालेल्या नाहीत. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत सर्वेक्षणानंतरची नवीन मालमत्तांची माहिती सादर करण्याचे निदेंश दिल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली. स्थायी समितीने ५०९ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. याचा विचार करता वसुली कमी आहे. मार्चअखेरीस यात अपेक्षित वाढ होईल. गेल्या वर्षी अभय योजना राबविण्यात आली होती. त्यानंतरही सप्टेंबरअखेरीस ७३ कोटींची वसुली झाली होती. त्यातुलनेत यंदा ११ कोटी अधिक वसुली झालेली आहे. म्हणजेच वसुलीकडे लक्ष आहे. परंतु जुनी थकबाकी वसलू करण्याचे निर्देश देण्यात आले. जे थकबाकी भरणार नाहीत, त्यांची मालमत्ता जप्त करून लिलावात काढण्याचे निर्देश दिले आहेत. याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. ई-गव्हर्नन्स प्रणालीकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या महिनाभरात कर विभागाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. डिमांड वाटपात अडचणी येत असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली. यावर तोडगा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वसुलीत सतरंजीपुरा मागे
महापालिकेच्या वसुलीचा झोननिहाय विचार करता सतरंजीपुरा वसुलीत सर्वात मागे आहे. या झोनची सप्टेंबर अखेरीस २.६५ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ३.८७ कोटींची वसुली करण्यात आली होती. मेयो रुग्णालयाला १.५० कोटीची डिमांड पाठविण्यात आली आहे. या कराची वसुली झाली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुली अधिक होणार आहे.
मालमत्ता कराची झोननिहाय वसुली (कोटीत)
झोन रक्कम
लक्ष्मीनगर १३.७०
धरमपेठ १४.०५
हनुमाननगर ०८.७१
धंतोली ०७.२७
नेहरूनगर ०६.२४
गांधीबाग ०३.४०
सतरंजीपुरा ०२.६५
लकडगंज ११.३१
आसीनगर ०६.१३
मंगळवारी ११.००