नागपुरातील वर्धा रोडवरील डबल डेकर जून २०१९ पर्यंत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:23 IST2018-11-14T22:22:52+5:302018-11-14T22:23:35+5:30
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत वर्धा रोडवर मेट्रोच्या कामांतर्गत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पूलाचे बांधकाम जून-२०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल डेबल डेकरशी जुळणार असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग पलीकडे राहणारे नागरिक थेट वर्धा रोडशी जुळणार आहे.

नागपुरातील वर्धा रोडवरील डबल डेकर जून २०१९ पर्यंत पूर्ण होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्यानागपूरमेट्रो प्रकल्पांतर्गत वर्धा रोडवर मेट्रोच्या कामांतर्गत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पूलाचे बांधकाम जून-२०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल डेबल डेकरशी जुळणार असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग पलीकडे राहणारे नागरिक थेट वर्धा रोडशी जुळणार आहे.
शहरातील पहिला डबल डेकर नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. याशिवाय मेट्रो मार्गाखाली तयार होणारा राष्ट्रीय महामार्ग मनीषनगर उड्डाण पुलाशी जुळणार आहे. डबल डेकर अजनी चौकापासून प्राईड हॉटेलपर्यंत राहणार आहे. डबल डेकरचे बांधकाम राष्ट्रीय महामार्गांतर्गत महामेट्रोतर्फे करण्यात येत आहे. या अंतर्गत खाली स्थानिक रस्ता, वर डबल डेकर आणि त्यावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. बांधकामासाठी एनएचएआयने मेट्रोला ४८० कोटी रुपये द्यायचे आहेत. आतापर्यंत महामेट्रोला एनएचएआयकडून केवळ १०० कोटी रुपये मिळाले आहेत.
वाहतूक होणार सुलभ
नागपूर मेट्रोचे बांधकाम शहराच्या चारही बाजूला ३४ महिन्यांपासून सुरू आहे. मार्च-२०१९ पर्यंत मिहान स्टेशन ते सीताबर्डीपर्यंत जवळपास ११.५ कि़मी. अंतरावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. डबल डेकरमुळे वर्धा रोडवरील वाहतूक सुलभ होणार आहे. महामेट्रोला मनीषनगर उड्डाणपूलआणि रेल्वे उड्डाण पूलासाठी १७ कोटी रुपये चार महिन्यांपूर्वीच मिळाले आहे. आतापर्यंत एनएचएआयकडून मेट्रोच्या खात्यात २६५ कोटी रुपये आले आहेत. त्यामुळे बांधकामाची गती वाढली आहे. त्यामुळे जून-२०१९ पर्यंत वर्धा रोडवर तिन्ही मार्गावरून लोकांची ये-जा सुरू होणार आहे.
वर्धा रोडवर गेल्या काही वर्षांत वाहतूक वाढली आहे. निरंतर होणाऱ्या जाममुळे नागरिक कंटाळले आहेत. पण डबल डेकरमुळे नागरिकांना अजनी चौकापासून प्राईड हॉटेलपर्यंत न थांबता काही मिनिटातच पोहोचता येईल. याशिवाय मनीषनगरकडून येणाऱ्या नागरिकांना रेल्वे क्रॉसिंग पुलावरून न थांबता थेट राष्ट्रीय महामार्गावर येता येईल.