विभक्त पत्नी आणि तिच्या पतीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:08 IST2021-09-19T04:08:22+5:302021-09-19T04:08:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पटत नसल्यामुळे विभक्त होऊन दुसऱ्यासोबत संसार थाटणाऱ्या महिलेवर आणि तिच्या पतीवर पहिल्या नवरोबाने हल्ला ...

Divorced wife and her husband beaten | विभक्त पत्नी आणि तिच्या पतीला मारहाण

विभक्त पत्नी आणि तिच्या पतीला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पटत नसल्यामुळे विभक्त होऊन दुसऱ्यासोबत संसार थाटणाऱ्या महिलेवर आणि तिच्या पतीवर पहिल्या नवरोबाने हल्ला चढवला. यात ती आणि तिचा पती जबर जखमी झाला. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची तक्रार महिलेने शुक्रवारी वाठोडा पोलीस ठाण्यात नोंदवली.

मनीष बाबाराव मिस्कीन आणि प्रभुदास गुलाब रामटेके (वय ३५), अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार महिला नंदनवनमध्ये राहते. आरोपी मनीष मिस्कीनसोबत तिचा विवाह झाला होता. मात्र, या दोघांमध्ये कटकटी वाढल्याने पटेनासे झाले. त्यावेळी नंदनवन ठाण्यात तक्रारीही झाल्या. त्यानंतर पती-पत्नी विभक्त झाले. महिलेने दुसऱ्या व्यक्तीशी वर्षभरापूर्वी विवाह केला. दरम्यान, काही दिवसापूर्वी मनीषला ती दिसली. यावेळी त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. बुधवारी तिला फोन करून त्याने वाठोड्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ भेटायला बोलविले. त्यानुसार ती तिच्या दुसऱ्या पतीसोबत मनीषला भेटायला आली. ते पाहून मनीष आणि त्याचा साथीदार प्रभुदास गुलाब रामटेके (वय ३५) हे दोघे चिडले. त्यांनी महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे महिला मध्ये पडली असता आरोपींनी तिलाही मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. तिच्याशी लज्जास्पद वर्तनही केले. बाजूची मंडळी धावल्यानंतर प्रकरण कसेबसे निपटले. दोन दिवस विचार केल्यानंतर महिलेने शुक्रवारी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी मनीष मिस्कीन आणि प्रभुदास रामटेके या दोघांविरुद्ध विनयभंग करून मारहाण करणे आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

---

Web Title: Divorced wife and her husband beaten