नागपूर : विद्यार्थिनींच्या तक्रारींची भीती दाखवून विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांकडून खंडणी वसुलीचा आराेप झेलणारे जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांना पुन्हा या विभागाच्या प्रमुख पदावर (एचओडी) नियुक्ती देण्याचा प्रस्ताव समाेर आला आहे. शिक्षा देण्याऐवजी माेठे पद बहाल करण्यात आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विभागाच्या सात विभाग प्रमुखांना मुलींच्या बनावट लैंगिक छळाच्या तक्रारीची भीती दाखवून त्यांच्याकडून १५ लाखांहून अधिक रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप प्रा. धवनकरांवर लागला हाेता. या आराेपांमुळे विद्यापीठाचे वातावरण ढवळून निघाले हाेते. नोव्हेंबर २०२२ मध्ये तक्रार समोर आल्यानंतर, प्रदीर्घ चौकशी व दबावानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते आणि प्रकरणाच्या चाैकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत चाैकशी समितीही नेमण्यात आली हाेती. पुढे २१ महिन्यांच्या सक्तीच्या रजेनंतर, ऑक्टोबर २०२४ मध्ये ते पुन्हा रुजू झाले हाेते. धवनकरांवर बनावट लैंगिक तक्रारी करून प्राध्यापकांना ब्लॅकमेल करणे, पीएचडी प्रकरणात पैशांची मागणी करण्याचेही गंभीर आरोप आहेत.
दरम्यान २१ महिने पदावर नसतानाही पगाराचे २१ लाखाहून अधिक रुपये धवनकरांना देण्यात आल्याचा मुद्दाही विद्यापीठात गाजला हाेता. विद्यापीठाच्या सामान्य काेषातून त्यांना पगार दिल्याचे समाेर आल्याने प्रशासन व सिनेट सदस्यांमध्ये खडाजंगी विद्यापीठाने पाहिली आहे. धक्कादायक म्हणजे विभागप्रमुखांकडून खंडणी वसुली प्रकरणातील चाैकशीमध्ये धवनकर दाेषी आढळून आले असतानाही विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर कठाेर कारवाई केली नाही. निलंबनाची अपेक्षा असताना केवळ इंक्रीमेंट थांबविण्यात आले हाेते. त्यावेळी कठाेर कारवाई न केल्याने विद्यापीठावर ही वेळ आली असल्याचे बाेलले जात आहे.
जनसंवाद विभागात पद रिक्त असल्याने मिळाली संधी
विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात बीजे, जनसंवादात एमए, व्हिडीओ प्राेग्रामिंग यासारखे अभ्यासक्रम शिकविले जातात. तरीही गेल्या अनेक वर्षापासून प्राध्यापकाची पदे रिक्त असून कंत्राटी प्राध्यापकांवर जबाबदारी आहे. विभागप्रमुख पदावरून प्रा. माेईज हक निवृत्त झाल्यानंतर तीन वर्षापासून विभागाचा प्रभार इतिहास विभागप्रमुखांकडे आहे. प्रा. धवनकर हे विभागात एकमेव पूर्णवेळी सहयाेगी प्राध्यापक आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळाल्याचे बाेलले जात आहे.
नियुक्ती नाही, प्रस्ताव विचाराधीन : कुलगुरू
"जनसंवाद विभागात रिक्त पदांची समस्या आहे व प्रा. धवनकर हे एकमेव पूर्णवेळ प्राध्यापक आहेत. जुन्या प्रकरणात चाैकशी नंतरही त्यांना काढण्यात आले नव्हते आणि ते कार्य करीत आहेतच. राज्यपाल कार्यालयाने हे केंद्र विकसित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे विभागप्रमुखाची जबाबदारी कुणालातरी साेपविण्याशिवाय पर्याय नाही. तरी अद्याप त्यांना नियुक्ती दिली नाही, हा प्रस्ताव विचाराधीन आहे."
- डाॅ. मनाली क्षीरसागर, कुलगुरू, नागपूर विद्यापीठ.
"प्रा. धवनकरांवर सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक आराेप झाले आहेत. खंडणी प्रकरणातही ते दाेषी आढळले हाेते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर कठाेर कारवाई न केल्याने विद्यापीठावर ही वेळ आली आहे."- अॅड. मनमाेहन वाजपेयी, सिनेट सदस्य
Web Summary : Despite extortion allegations, Professor Dhawanakar may regain his HOD post. Accusations include blackmailing professors and demanding money. Previous inquiry found him guilty, but lenient action has sparked controversy within Nagpur University.
Web Summary : खंडणी के आरोपों के बावजूद, प्रोफेसर धवनकर फिर से एचओडी बन सकते हैं। आरोपों में प्रोफेसरों को ब्लैकमेल करना और पैसे मांगना शामिल है। पिछली जांच में उन्हें दोषी पाया गया, लेकिन नरम कार्रवाई ने नागपुर विश्वविद्यालय में विवाद पैदा कर दिया है।