Join us
Daily Top 2Weekly Top 5

Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 07:41 IST

RTO: फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये वेबसाइटमधील त्रुटींचा गैरवापर वाढल्याने निर्णय 

महेश कोले लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: ‘लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स’ची परीक्षा देण्यासाठी यापुढे आरटीओ कार्यालयामध्ये जावे लागणार आहे. फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये वेबसाइटमधील त्रुटींचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने लायसन्स काढण्याचे प्रकार वाढत असल्याने परिवहन आयुक्तालय हा निर्णय घेणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लर्निंग लायसन्स प्रक्रिया नागरिकांच्या सोयीसाठी ‘फेसलेस’ करण्यात आली आहे; परंतु ते आता राष्ट्रीय सुरक्षेचा दृष्टीने धोकादायक ठरत आहे. नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरच्या सुरक्षा सॉफ्टवेअरला (एनआयसी) बगल देऊन उमेदवाराशिवाय ‘लर्निंग लायसन्स’ चाचणी देणे आणि उत्तीर्ण होणे शक्य असल्याची गंभीर बाब उजेडात आली होती. त्यानंतर आरटीओने गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयसीने लर्निंग लायसन्ससाठी वेबसाइटमध्ये सुधारणा करून ही सेवा सुरू केली; परंतु असे असूनही चुकीच्या पद्धतीने लायसन्स काढण्याचे प्रकार थांबत नसल्याने आता इच्छुकांना आरटीओमध्ये बोलावून त्यांची लर्निंग लायसन्स टेस्ट घेण्याची तयारी सुरू आहे. 

असा असेल ‘ऑनलाइन अर्ज, ऑफलाइन परीक्षा’ मॉडेल 

- नवीन प्रस्तावानुसार, अर्जदारांना सध्याच्या पद्धतीनुसार ऑनलाइन अर्ज भरून स्लॉट बुक करता येईल. मात्र, चाचणी देण्यासाठी त्यांना संबंधित आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल. यामुळे अर्जदार आणि परीक्षार्थी एकच व्यक्ती असल्याची खात्री करता येईल. या निर्णयामुळे गैरप्रकारांना आळा बसण्याचा दावा केला जात असला, तरी नागरिकांची सोय आणि पारदर्शकतेचा समतोल कसा राखला जाणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.  

- लर्निंग लायसन्स चाचणीसाठी नागरिकांना प्रत्यक्ष आरटीओत हजर राहावे लागल्यास कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. ती हाताळताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडू शकते, असे जाणकारांचे मत आहे. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच दलालगिरीला पुन्हा प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वेबसाइटच्या सुरक्षेला  कशी देतात बगल? 

वेबसाइटच्या डेव्हलपर टूलच्या माध्यमातून जावा कोड बदलला जातो. त्यानंतर ऑनलाइन फॉर्ममध्ये संबंधिताची माहिती व्हेरिफिकेशनशिवाय भरली जाते. कुणाच्याही नावासमोर कोणाचाही फोटो लावता येऊ शकतो. यासाठी आधारकार्ड व्हेरिफिकेशनची गरज भासत नाही. परीक्षा देताना उमेदवाराला समोर असावे लागत नाही. लर्निंग लायसन्स देण्याची कागदोपत्री संपूर्ण जबाबदारी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांची असली तरीसुद्धा त्यात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Learning License Process Back Offline to Curb Malpractice: RTO's Move

Web Summary : To prevent misuse, learning license tests are reverting to offline at RTOs. Online system flaws allowed fraudulent licenses, prompting the change. Applicants will book slots online but must appear in person for the test, ensuring identity and curbing irregularities, though concerns about crowds and brokers remain.
टॅग्स :आरटीओ ऑफीसमुंबईमहाराष्ट्र