नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 23:01 IST2025-11-24T23:01:00+5:302025-11-24T23:01:21+5:30
२५ वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. तत्कालिन क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख यांनी ६ जानेवारी २०००ला त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी धर्मेंद्र यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
नरेश डोंगरे -
नागपूर : कुत्ते, कमिने, मै तेरा खून पी जाऊंगा... मै उन्हे चून चून के मारूंगा... असे म्हणत रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने दबंगगिरी करणारे चित्रपट सृष्टीतील 'ही मॅन' नागपुरातील पत्रपरिषदेतही एकदा भडकले होते. मात्र, त्यानंतर काही वेळेतच त्यांनी वास्तव जिवनातील 'हिरोगिरी'वर भाष्य करीत वातावरण हलके-फुले केले होते.
२५ वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. तत्कालिन क्रिडा आणि सांस्कृतिक मंत्री अनिल देशमुख यांनी ६ जानेवारी २०००ला त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी धर्मेंद्र यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. वातावरण अतिशय हलके फुले असताना एका पत्रकाराने 'ईशा देओल'ला चित्रपटात कधी आणणार, असा सवाल केला. या प्रश्नाने धरमपाजी भडकले. त्यांनी व्यक्तीगत प्रश्न कशाला विचारता, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यांचे मूड गेल्याचे लक्षात येताच दुसऱ्या एका पत्रकाराने विषय बदलवला. २४ डिसेंबर १९९९ ला काठमांडू ते दिल्ली उड्डाण करणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या आयसी ८१४ विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. या विमानात १५ क्रू मेंबर आणि १९१ प्रवासी होते. हे प्रकरण तेव्हा देश-विदेशात चर्चेत होते. त्याला अनुसरून एका पत्रकाराने धर्मेंद्र यांना विचारले, 'आप उस फ्लाईट मे होते तो क्या करते, क्या उन आतंकियो मार मार कर, अपने सभी देशवासियोंको सही सलामत वापस लाते', असा हा प्रश्न होता. धर्मेंद्र यांनी त्याचे उत्तर देताना म्हटले...
'नही भाई... फिल्मो की बात और है... असल जिंदगी मे हम भी आप जैसे ही एक सिधे साधे ईन्सान है. सो मै उस फ्लाईट मे होता तो बाकी पॅसेंजर ने जो किया, वही मै भी करता. त्यांचे हे उत्तर त्यांच्यातील सच्चेपणाची जाणीव करून देणारे होते. परिणामी 'बहोत खूब' म्हणत त्यांना पत्रकारांसह अन्य उपस्थितांनीही दाद दिली होती.
पल पल दिल के पास...चा प्रसंग, कल्याणजी म्हणाले...
चित्रपटात मारधाड करणारे धर्मेंद्र प्रत्यक्षात मात्र खूप हळवे होते, हे सांगताना सुप्रसिद्ध संगितकार कल्याणजी (आनंदजी) भाई यांनी १० जुन २०२३ ला नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या एका स्टेज शो मध्ये किस्सा ऐकवला होता. १९७३ ला ब्लॅकमेल चित्रपटात कल्याणजी-आनंदजीच्या जोडीने त्यांच्यासाठी 'पल पल दिल के पास... तुम रहेती हो...' हे गीत बनविले. त्यावर अभिनय करताना धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे अप्रतिम होते अन् डायरेक्टर, प्रोड्युसरसह आम्ही सर्वच कसे ते पाहून स्तंभित झालो होतो, ते कल्याणजी यांनी सांगितले. यावेळी खचाखच भरलेल्या सुरेश भट सभागृहाने प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला होता.