नागपूर शहराचा विकास आराखडा तयार होणार; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
By कमलेश वानखेडे | Updated: January 23, 2025 18:45 IST2025-01-23T18:44:21+5:302025-01-23T18:45:21+5:30
Nagpur : मध्यवर्ती कारागृहही स्थलांतरित होणार

Development plan for Nagpur city to be prepared; Guardian Minister Chandrashekhar Bawankule announces
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा (डीपी) तयार करण्यात येणार आहे. नासुप्रचे कार्यकक्षेत समाविष्ट करूनच ‘डीपी’ तयार करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचेही स्थानांतर करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये बोलताना बावनकुळे यांनी नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध विकास योजनांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, मध्यवर्ती कारागृहासाठी कोराडी रोडजवळील मौजा बाभूळखेडा आणि चिचोली गावातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ १५० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. कारागृहासाठी जमीनही आरक्षित करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. कारागृह स्थलांतरित झाल्याने ऑनलाइन सुनावणी शक्य होईल.
पालकमंत्री ही शोभेची वस्तु नाही
पालकमंत्री हे पद शोभेची वस्तु नाही. तो जनतेचा पालक आहे. सरकारच्या कल्याणकारी योजना समाजीतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्याची असते. नागपूरच्या रवि भवनात पालकमंत्र्यांचे कार्यालय उघडले जाईल. अमरावती येथेही कार्यालय सुरू केले जाईल.
दीक्षाभूमी वरील कामे सुरू होणार
दीक्षाभूमि विकासाचे रखडेली कामे त्वरित सुरू केली जातील. यासाठी लवकरच बैठक घेऊन आढावा घेतला जाईल. ताजबागच्या विकासाला गती दिली जाईल. रामटेक विकास आराखड्याला गत दिली जाईल. जनतेच्या भावना विचारात घेऊन शक्य तेवढे चांगले काम केेले जाईल, असेही बावनकुळे म्हणाले.
पत्रकारांसाठी हाउसिंग स्कीम
नागपूर व अमरावती येथे पत्रकारांसाठी हाउसिंग स्कीम उभारली जाईल. नागपुरात जागेची निवड झाली आहे. म्हाडा मार्फत योजना पूर्ण करण्याची तयारी आहे. या संदर्भात लवकरच विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली जाईल, असेही बावकुळे म्हणाले.