शाळांना डेंग्यूचा डंख

By Admin | Updated: September 6, 2016 02:23 IST2016-09-06T02:23:37+5:302016-09-06T02:23:37+5:30

पालकांनो सावधान. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या

Dengue scars in schools | शाळांना डेंग्यूचा डंख

शाळांना डेंग्यूचा डंख

३३ शाळेत डेंग्यू डासांच्या अळ्या : मनपाच्या पाहणीत आढळून आले वास्तव
नागपूर : पालकांनो सावधान. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या पाहणीत तब्बल ३३ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. शाळांमध्ये डेंग्यूची उत्पत्ती ही कूलर्स, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, ड्रममधून होत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, डेंग्यूचा डास दिवसा चावत असल्याने आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत रहात असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या कमी आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे हे शक्य झाले झाले आहे. गेल्या वर्षी २३० रुग्ण आढळून आले होते. यावर्षी आतापर्यंत ५६ रुग्ण आढळून आले आहेत. परंतु शाळांमध्ये डासांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना होतच नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. यावर्षी शाळा सुरू झाल्यापासून मनपाच्यावतीने शाळांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यात ३३ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या.

गेल्या काही वर्षांपासून शाळा-शाळांमध्ये जाऊन डेंग्यू डासांची माहिती दिली जात आहे. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानंतरही केलेल्या पाहणीत शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. हे धक्कादायक आहे. शाळा प्रशासनाने याविषयी गंभीर होणे आवश्यक आहे.
-डॉ. जयश्री थोटे
अधिकारी, हिवताप व हत्तीरोग विभाग मनपा

Web Title: Dengue scars in schools