जीवघेण्या 'स्क्रब टायफस'ने पूर्व विदर्भात काढले पुन्हा डोके वर.. गोंदियात आढळले सात रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:12 IST2025-09-02T16:11:37+5:302025-09-02T16:12:25+5:30

Nagpur : स्क्रब टायफसने २०१८ मध्ये खळबळ उडून दिली होती. १५५ रुग्ण व २९ मृत्यूची नोंद झाली होती. पूर्व विदर्भात 'स्क्रब टायफस' या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे.

Deadly 'scrub typhus' resurfaces in East Vidarbha.. Seven patients found in Gondia | जीवघेण्या 'स्क्रब टायफस'ने पूर्व विदर्भात काढले पुन्हा डोके वर.. गोंदियात आढळले सात रुग्ण

Deadly 'scrub typhus' resurfaces in East Vidarbha.. Seven patients found in Gondia

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
स्क्रब टायफसने २०१८ मध्ये खळबळ उडून दिली होती. १५५ रुग्ण व २९ मृत्यूची नोंद झाली होती. पूर्व विदर्भात 'स्क्रब टायफस' या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे सात रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाळ्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हा आजार 'चिगर माइट्स' नावाच्या सूक्ष्म किटकांमुळे होतो, जे सहसा उंदरांच्या शरीरावर आढळतात. पावसाळ्यात उंदरांच्या बिळात पाणी शिरल्यावर हे माइट्स बाहेर पडतात आणि गवत, शेतजमिनी किंवा झुडपांमध्ये पसरतात. मानवी त्वचेच्या संपर्कात आल्यावर, 'ओरिएन्शिया सुसुगामुशी' नावाचे जिवाणू शरीरात प्रवेश करतात आणि संसर्ग करतात. जिथून प्रवेश करतात ती जागा दुखत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. चावलेल्या ठिकाणी व्रण येतो. ज्याला 'इशर' म्हणतात. हा 'इशर' या आजाराची ओळख आहे, परंतु सर्वांमध्ये 'इशर' दिसूनच येईल, असे नाही. 

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे स्क्रब टायफस संशयित १३ रुग्णांची नोंद झाली. सात रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ९ व १६ वर्षाच्या मुलीसह ३५ वर्षीय तरुणी व ५५ वर्षीय महिला आहेत.

"स्क्रब टायफसचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने उपचार करणे महत्त्वाचे आहे. याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. लवकर निदान, वेळीच उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता येतो. सध्या गोंदिया जिल्ह्यातच रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, गंभीर लक्षणे नाहीत."
-डॉ. शशिकांत शंभरकर, उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर.
 

Web Title: Deadly 'scrub typhus' resurfaces in East Vidarbha.. Seven patients found in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.