मनोरुग्णालयात मधमाशांचा जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, ३९ जखमी
By सुमेध वाघमार | Updated: November 20, 2025 19:40 IST2025-11-20T19:37:38+5:302025-11-20T19:40:22+5:30
Nagpur : मानकापूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात गुरुवारी दुपारच्या वेळी एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने खळबळ उडवून दिली.

Deadly bee attack at psychiatric hospital; one dead, 39 injured
नागपूर: मानकापूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात गुरुवारी दुपारच्या वेळी एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने खळबळ उडवून दिली. दुपारच्या जेवणासाठी एकत्र आलेल्या मनोरुग्णांवर अचानक मधमाशांच्या थव्याने जोरदार हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यात किसन विलास (६०) या वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला असून, इतर ३८ रुग्ण आणि २ कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेने रुग्णालय प्रशासनात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वॉर्ड क्रमांक ४ आणि ५ मधील रुग्णांची जेवणाची वेळ झाली होती. वºहांड्यात बसून रुग्ण शांतपणे जेवण करत असतानाच दीड वाजताच्या सुमारास अचानक मधमाशांचा एक मोठा थवा चालून आला. मनोरुग्ण असल्याने अनेकांना स्वत:चीच शुद्ध नव्हती, त्यामुळे या हल्ल्याचा प्रतिकार कसा करावा किंवा स्वत:चा बचाव कसा करावा, हे त्यांना समजले नाही. सुमारे १५ ते २० मिनिटे हा थरार सुरू होता. या कालावधीत मधमाशांनी रुग्णांच्या तोंडावर आणि हातावर बेसुमार डंख मारले. परिस्थिती इतकी भयानक होती की, उपस्थित कर्मचाºयांनाही बचावाची संधी मिळाली नाही.
धक्क्याने मृत्यू
या हल्ल्यात किसन विलास हे वृद्ध रुग्ण गंभीर जखमी झाले होते. त्यांना आधीच 'सीओपीडी'चा (श्वसनाचा विकार) त्रास होता. मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठविण्यात आले असून मानकापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.