क्रिप्टो करन्सीत ५० कोटींची फसवणूक ! देशभरातील लोकांना नफ्याचे आमिष दाखवून लुबाडले; ईडीने घातले छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:38 IST2026-01-15T14:37:29+5:302026-01-15T14:38:23+5:30
Nagpur : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली ५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात निशिद महादेवराव वासनिक आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित तीन ठिकाणी ईडीने छापे टाकले आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

Cryptocurrency fraud of Rs 50 crore! People across the country were cheated by luring them with profits; ED raids
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली ५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात निशिद महादेवराव वासनिक आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित तीन ठिकाणी ईडीने छापे टाकले आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. छापेमारीदरम्यान, ईडीने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे, रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणे जप्त केली. बँक खात्यातील २० लाख, अंदाजे ४३ लाखांचे क्रिप्टो वॉलेट गोठवण्यात आले आहे.
निशिद वासनिकने क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचे आश्वासन देऊन लोकांना लुटले. तो इथर ट्रेड एशिया नावाची कंपनी चालवत होता आणि त्यामाध्यमातून देशभरातील लोकांची फसवणूक केली. त्याने आलिशान हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित करून लोकांना आकर्षित केले. सुरुवातीला, लोकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले गेले. फसवणूक झालेले पैशांची विल्हेवाट लावल्यानंतर निशिद भूमिगत झाला. गुंतवणूकदारांवर दबाव आणण्यासाठी त्याने काही जणांना धमकावलेदेखील होते.
फेब्रुवारी २०२२ मध्ये, पीडितांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तपासात असे दिसून आले की २००० हून अधिक लोकांची ५० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी निशिद, त्याची पत्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक आलिशान कार जप्त करण्यात आली. फसवणुकीच्या निधीतून निशिदने नागपूर, चंद्रपूर, पुणे आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्या होत्या.
ईडीने या प्रकरणातही गुन्हा दाखल केला आणि ईडीने छापे टाकले. निशिद आणि त्याचे सहकारी तुरुंगात आहेत. निशिदने फसवणुकीच्या निधीचा मोठा हिस्सा नेमका कुठे गुंतविला आहे याचा पत्ता लागू शकलेला नाही.