Crime : नागपुरात संतापजनक घटना ! एकतर्फी प्रेमातून त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा चिरला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:42 IST2025-11-19T14:41:00+5:302025-11-19T14:42:10+5:30
Nagpur : दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने लोकांनी तिला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांना पाहून सूरज पळून गेला. पोलिसांना माहिती देण्यात आली.

Outrageous incident in Nagpur! He slit the throat of a minor student out of one-sided love
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकतर्फी प्रेमाच्या नशेतून एका तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा गळा चिरत तिचा दिवसाढवळ्या जीव घेण्याचा प्रयत्न केला. इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अशोक चौकाजवळ घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपी मनपाचा कंत्राटी कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूरज कृष्णप्रसाद शुक्ला (२६, इमामवाडा) असे आरोपीचे नाव आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी एका महाविद्यालयात शिकते व सूरजचे तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. त्यातून तो अनेकदा तिचा पाठलाग करायचा. मात्र, ती प्रतिसाद देत नव्हती. तो तिला अडवून बोलण्यास व सोबत फिरण्यास चल, असे म्हणायचा. काही दिवसांअगोदर सूरजने तिचा हात धरला आणि अनुचित वर्तन केले होते. तिने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी सूरजच्या घरी घडलेली घटना सांगितली. त्यामुळे सूरज संतापला. त्याने रागातून तिचा पाठलाग सुरू केला. सोमवारी सकाळी विद्यार्थिनी महाविद्यालयाकडे निघाली. सूरजने तिचा पाठलाग करीत तिला अशोक चौकात थांबवले. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या सूरजने मी तुला जिवंतच सोडत नाही, असे म्हणत तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला. यात तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यानंतर लगेच त्याने तिच्या गळ्यावर कटरने वार करीत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
लोकांनी घेतली धाव अन् तो पळून गेला
दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने लोकांनी तिला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांना पाहून सूरज पळून गेला. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने तातडीने विद्यार्थिनीला रुग्णालयात नेले. पोलिसांनी शोधमोहीम राबवत सूरजला अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, पाठलाग, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.