पराभवाच्या भितीमुळे कॉंग्रेसकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
By योगेश पांडे | Updated: December 1, 2025 16:48 IST2025-12-01T16:48:04+5:302025-12-01T16:48:54+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : पक्षातील विसंवादामुळे अनेक कॉंग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक

Congress is trying to spread 'fake narrative' due to fear of defeat; Chandrashekhar Bawankule criticizes
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :काँग्रेस नेत्यांमध्ये गंभीर विसंवाद असून त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये आणखी खिंडार पडेल, अशी भीती त्यांच्या नेत्यांनाच वाटू लागली आहे. त्यामुळे ‘काँग्रेस बचाव मोहिम’ राबवत फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. सोमवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप ‘ऑपरेशन लोटस’ राबवत असल्याचा आरोप केला. मात्र आम्ही अशा भानगडीत पडत नाही. नाना पटोले फक्त दोनशे मतांनी जिंकून आले आहेत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या साकोली मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली आहे. आज काँग्रेस किंचित पक्ष होत चालला असून अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. पुढच्या काळात ते भाजपमध्ये प्रवेश करतील. या भीतीमुळे कॉंग्रेसकडून फेक नॅरेटिव्ह पसरविण्यात येत आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.
काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होत आहे. एकमेकांविरुद्ध लढत असलो तरी आमच्यात मनभेद नाहीत. समन्वयातून महायुती टिकवू. २ डिसेंबरनंतर सर्व मतभेद संपतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी
निवडणूक आयोगाने मतदानाच्या अखेरच्या ४८ तासांपूर्वी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेणे अनाकलनीय आहे. कोणत्या नियमांतर्गत हा निर्णय घेतला, याचा अभ्यास करावा लागेल. २३ नोव्हेंबरलाच हा विचार झाला असता तर एवढी तारांबळ उडाली नसती. मतदानाच्या आदल्या दिवशी असे धक्कादायक निर्णय घेणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.
शहाजी बापुंवरील कारवाई कुणाच्या सांगण्यावरून नाही
शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावरील कारवाई ही कुणीतरी तक्रार केल्यामुळे करण्यात आली आहे. कुणी तक्रार केली तर निवडणूक आयोगाकडून कारवाई होतेच. त्यामुळे हे कुणाच्या सांगण्यावरून केले, असे म्हणणे चुकीचे आहे, अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली.