जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात संतप्त नागरिकांचा गोंधळ

By Admin | Updated: April 20, 2016 03:24 IST2016-04-20T03:24:22+5:302016-04-20T03:24:22+5:30

पाणी समस्येबाबत जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याची भावना झाल्यामुळे संतप्त झालेल्या वाडीतील ...

Confusion of angry citizens in District Room | जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात संतप्त नागरिकांचा गोंधळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात संतप्त नागरिकांचा गोंधळ

नागपूर : पाणी समस्येबाबत जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याची भावना झाल्यामुळे संतप्त झालेल्या वाडीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या कक्षात सोमवारी दुपारी गोंधळ घातला.
यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र रामभाऊ कुंभारे (वय ५४) यांनी सदर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी २ च्या सुमारास जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या कक्षात अस्मिता प्रणय मेश्राम, नरेंद्र मेंढे, मंगला वाघमारे. मंजुळा चौधरी, आशिष नंदागवळी, प्रमोद भोवरे, प्रज्ञा वासनिक, मनोज भांगे यांच्यासोबत आणखी १५ ते २० जण आले. त्यांनी वाडीतील पाणी प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी वाद घालणे सुरू केले.
प्रशासकीय अडचणीवर मात करून आपण या प्रश्नावर तातडीने मार्ग काढू असे जिल्हाधिकारी समजावत होते. मात्र, आरोपी नुसते आरडाओरड करून गोंधळ करीत होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी असभ्य वर्तन केले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या प्रकाराची सदर पोलिसांना सूचना देण्यात आली.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेज आणि कार्यालयातील प्रत्यक्षदर्शींचे आज पोलिसांनी बयाण नोंदविले. या प्रकरणात आरोपींपैकी किती जणांनी गोंधळ घातला, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Confusion of angry citizens in District Room