नागपूर : महापालिकेतील काँग्रेसच्या कोट्यातील स्वीकृत सदस्य म्हणून आ विकास ठाकरे यांचे पुत्र व महाराष्ट्र प्रदेशा काँग्रेस कमिटीचे महासचिव केतन विकास ठाकरे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अतुल कोटेचा यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर नीता ठाकरे यांनी ९ स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा केली.
काँग्रेसच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांनी शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वादानंतर केतन ठाकरे यांनी महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी सादर केलेला अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविली होती.
त्यांनी याबाबत विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांना पत्र लिहून आपले नामनिर्देशन परत घेण्याची विनंती केली होती. परंतु याबाबत प्रशासनाकडे कुठलाही पत्रव्यवहार न झाल्याने बुधवारी सर्वसाधारण सभेत महापौर नीता ठाकरे यांनी केतन ठाकरे व अतुल कोटेचा यांच्याही नावाची घोषणा केली.
पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त झालेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर व पक्षात कोणताही अंतर्गत वाद निर्माण होऊ नये, यासाठी विरोधी पक्षनेत्यांना आपला अर्ज परत घेण्यासाठी पत्र दिले असल्याची माहिती केतन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
परंतु महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीचा अधिकार हा त्या-त्या पक्षाच्या गटनेत्यांना असतो. त्यानुसार संजय महाकाळकर यांनी काँग्रेस कोट्यातून अतुल कोटेचा व केतन ठाकरे यांचे स्वीकृत सदस्यत्वासाठी मनपा आयुक्त यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले होते.
मनपातील ९ स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
सर्वसाधारण सभेदरम्यान नऊ स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यात भाजपच्या ६, शिंदेसेनेकडून १ आणि काँग्रेसकडून २ नावांची घोषणा झाली. मात्र एमआयएम आणि मुस्लिम लीगच्या कोट्यातील मनोनीत सदस्यांचे नाव जाहीर होऊ शकले नाही.
भाजपकडून देवेंद्र मेहर, सुबोध आचार्य, संजय ठाकरे, जीतू ठाकूर, रितेश गावंडे आणि विनोद बघेल यांची निवड करण्यात आली. शिंदेसेनेकडून सुरेश गोजे यांची तर काँग्रेसकडून केतन ठाकरे आणि अतुल कोटेचा यांची नामनिर्देशित नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार निर्णय घेणार : महाकाळकर
महापालिकेतील नामनिर्देशित सदस्यासाठी केलेला अर्ज केतन ठाकरे यांनी मागे घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव शहर अध्यक्षांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. पक्षाकडून जे आदेश प्राप्त होतील. त्यानुसार केतन ठाकरे यांच्या स्वीकृत सदस्यत्वावर निर्णय घेतला जाईल. याबाबत अद्याप पक्षाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे केतन ठाकरे यांचा अर्ज कायम ठेवण्यात आल्याची माहिती संजय महाकाळकर यांनी दिली.
Web Summary : Despite internal disputes, Ketan Thackeray and Atul Kotecha were appointed as Congress members in Nagpur Municipal Corporation. Their selection faced opposition, but ultimately, the party leaders confirmed their positions in the general assembly.
Web Summary : आंतरिक विवादों के बावजूद, केतन ठाकरे और अतुल कोटेचा को नागपुर नगर निगम में कांग्रेस सदस्य के रूप में नियुक्त किया गया। उनके चयन का विरोध हुआ, लेकिन अंततः पार्टी नेताओं ने महासभा में उनकी स्थिति की पुष्टि की।