जानेवारीतही थंडीच्या लाटा कायम ! पारा राहिल सरासरीच्या खाली; मार्चपर्यंत पावसाची शक्यता ?
By निशांत वानखेडे | Updated: January 1, 2026 20:29 IST2026-01-01T20:28:06+5:302026-01-01T20:29:07+5:30
Nagpur : डिसेंबरमध्ये छळणाऱ्या थंडीपासून जानेवारी महिन्यातही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीत. तीव्रता कमी राहणार असली तरी थंडीचा प्रभाव मात्र कायम राहणार आहे.

Cold waves continue in January too! temperature will remain below average; Chance of rain till March?
नागपूर : डिसेंबरमध्ये छळणाऱ्या थंडीपासून जानेवारी महिन्यातही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीत. तीव्रता कमी राहणार असली तरी थंडीचा प्रभाव मात्र कायम राहणार आहे. मध्य भारतासह उत्तरेकडील काही राज्यात एक-दाेन वेळा थंडीची लाट येण्याचीही शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पत्रकाद्वारे याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.
वेधशाळेने गुरुवारी जानेवारी ते मार्च २०२६ या काळातील हवामानाचे निरीक्षण जारी केले. या निरीक्षणानुसार जानेवारी महिन्यात उत्तर भारत व मध्य भारतात रात्रीचे तापमान मासिक सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. यात विदर्भाचाही समावेश आहे. उत्तर-पश्चिम भारतातील पूर्व व पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर व लद्दाख या राज्यात, तसेच मध्य भारतातील मध्य प्रदेश, झारखंड, विदर्भ या भागात किमान तापमान मासिक सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रदेशात थंडीच्या लाटा येण्याची शक्यता नेहमीच्या सरासरीपेक्षा अधिक राहण्याचाही अंदाज आहे. मध्य भारतातही एक ते दाेन वेळा थंड लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मध्य भारतात दिवसाचे कमाल तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. पूर्वाेत्तर राज्ये आणि दक्षिणेकडील राज्यात मात्र तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.
जानेवारीत नाही, पण मार्चपर्यंत पावसाची शक्यता अधिक
वेधशाळेने पावसाबाबतही अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भासह मध्य भारतात जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता नेहमीच्या सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र मार्चपर्यंत तीन महिन्याच्या काळात हाेणारा पाऊस नेहमीच्या सरासरीपेक्षा अधिक असेल, असा अंदाज आहे. विशेषत: मध्य भारत आणि उत्तर प्रदेशच्या मैदानी क्षेत्रात तीन महिन्याच्या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचे भाकितही वेधशाळेने वर्तवले आहे.