ढगांनी राेखला सूर्याचा ताप ! विदर्भातील तापमान घसरले
By निशांत वानखेडे | Updated: April 26, 2025 19:02 IST2025-04-26T19:02:18+5:302025-04-26T19:02:38+5:30
Nagpur : उष्ण लाटांपासून दिलासा

Clouds block the heat of the sun! Temperatures drop in Vidarbha
निशांत वानखेडे
नागपूर : मागील आठवडाभरापासून उष्ण लाटांच्या प्रखर उन्हापासून त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांना शनिवारी आकाशात दाटलेल्या ढगांनी माेठा दिलासा दिला. आकाश व्यापलेल्या ढगांनी सूर्यकिरणांची वाट राेखली आणि नागपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घटले. उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला, पण वातावरणातील उष्ण वारे शरीराला झाेंबत राहिले.
मागील संपूर्ण आठवडा वैदर्भीयांसाठी तापदायक गेला. चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अकाेला शहरांचा पारा ४५ पार जात जागतिक उष्ण शहरांच्या यादीत पाेहचला हाेता. नागपूरसह इतर शहरेही ४४ ते ४५ अंशाच्या दरम्यान पाेहचली हाेती. विदर्भात मुक्कामी असल्यासारखा सूर्याने उन्हाचा कहर केला. तापदायक वातावरणामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले.
दरम्यान हवामान विभागाने २७ एप्रिलपासून पुन्हा अवकाळीची स्थिती निर्माण हाेईल, असा अंदाज वर्तविला हाेता. या अंदाजाच्या एक दिवसाच्या अगाेदरच ढगाळ वातावरण तयार झाले. शनिवारी सकाळी उन्ह तापले हाेते, पण दुपार हाेईपर्यंत वातावरण बदलत गेले आणि आकाशात ढगांची गर्दी झाली. या ढगांनी सूर्यकिरणांची वाट राेखली. त्यामुळे तापमान खाली आले. नागपूरला १.४ अंशाची घट हाेत पारा ४२.६ अंशावर पाेहचला. भयंकर तापलेल्या चंद्रपूरच्या तापमानात ३.४ अंशाची घसरण हाेत पारा ४२ अंशावर आला. मात्र जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचा ताप शनिवारीही कायम हाेता. येथे ४४.२ अंश तापमान नाेंदविण्यात आले, जे विदर्भात सर्वाधिक राहिले.
इतर जिल्ह्यातही ढगाळ वातावरणामुळे पारा १ ते २ अंशाने खाली आला. अकाेला ४३.९, अमरावती ४२.८, भंडारा ४१, गाेंदिया ४०.९, वर्धा ४२.६, यवतमाळ ४२.४ आणि वाशिमला ४१.४ अंशाची नाेंद झाली आहे.
एप्रिलचा शेवट, मे ची सुरुवात ‘ताप’मुक्त
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात सुरुवातीपासून आतापर्यंत उन्हाचा त्रास सहन करावा लागला असला तरी महिन्याचा शेवट मात्र तापमुक्त असणार आहे. पुढचे सर्व दिवस अवकाळीची स्थिती असून वीजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमीचे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मे महिन्याचे सुरुवातीचे दिवसही हीच स्थिती असेल. त्यानंतर मात्र पारा पुन्हा चढेल, असा अंदाज आहे.