‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:14 IST2025-10-13T09:13:48+5:302025-10-13T09:14:52+5:30
‘चुकीच्या कारणांवर’ आधारित परताव्याचे दावे : शासनाची फसवणूक, राज्यभरातील हजारो शिक्षकांना हजर राहण्याचे खरमरीत समन्स

‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
बालाजी देवर्जनकर -
नागपूर : ज्यांच्या हाती भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, त्या ‘गुरुजीं’नाच स्वतःच्या आर्थिक व्यवहारांसाठी आयकर विभागाच्या दारात हजेरी लावावी लागत आहे. महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना आयकर कायद्याच्या ‘सेक्शन १३१ (१ ए)’अंतर्गत समन्स बजावण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
आयकर विभागाच्या समन्समध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, शिक्षकांनी मूल्यांकन वर्ष २०२५-२६ आणि मागील वर्षांच्या आयकर विवरणपत्रांमध्ये ‘चुकीच्या कारणांवर’ आधारित परताव्याचे दावे केले आहेत. थोडक्यात, टॅक्स सेव्हिंगच्या नावाखाली नियमांचा गैरफायदा घेऊन शासनाला चुना लावण्याचा प्रयत्न झाला आहे.
कार्यालयात हजर होण्याचे आदेश
आयकर विभागाने कलम १३१ (१ए) नुसार शिक्षकांना समन्स बजावले आहे. यामध्ये, शिक्षकांना सर्व ‘बुक्स ऑफ अकाऊंट्स’ (हिशेबाची पुस्तके) आणि कागदपत्रे घेऊन कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
शिक्षक सीए अन् टॅक्स कन्सल्टंट्सच्या दारात
या समन्समुळे हजारो शिक्षक सीए आणि टॅक्स कन्सल्टंट्सच्या दारात उभे आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रवृत्तीमुळे प्रामाणिकपणे कर भरणारे शिक्षकही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्यभरातील काही सीएंकडे धाडी पडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला आहे.
केवळ शिक्षण विभागच नव्हे तर सरकारच्या इतर विभागातही हे प्रकार सुरू असून, ‘आयकर विभागा’चा मोर्चा तिकडेही वळणार अशी विश्वसनीय माहिती आहे.
निदर्शनास आली अशी ‘हेराफेरी’
बनावट भाडेपट्टी : ‘एचआरए’ (घरभाडे भत्ता) मध्ये सूट मिळविण्यासाठी अनेक शिक्षकांनी स्वत:च्या आई-वडिलांना किंवा जवळच्या नातेवाइकांना भाडे दिल्याच्या बनावट पावत्या सादर केल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्षात ते त्याच घरात राहतात. पण, कागदोपत्री भाडे दाखवून मोठी वजावट मिळवली जाते.
बनावट गृहकर्ज प्रमाणपत्र : ज्यांनी गृहकर्ज घेतलेले नाही, अशांनीही कर्जावरील व्याजाच्या वजावटीचा लाभ घेतल्याची प्रकरणे तपासणीत समोर आली आहेत.
डबल क्लेम : अनेक शिक्षकांनी एकाच गुंतवणुकीची (उदा. एलआयसी किंवा पीपीएफ) वजावट दोन ठिकाणी दाखवून अधिक ‘रिफंड’ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
बनावट वैद्यकीय खर्च : वैद्यकीय खर्चाच्या बनावट पावत्या जोडून किंवा अनावश्यक वजावटी दाखवून करपात्र उत्पन्न कमी दाखवण्याचा हा सर्रास प्रकार शक्षणक्षेत्रात फोफावला आहे. यामुळे ‘प्रामाणिकपणा’ आणि ‘टॅक्स प्लानिंग’च्या नावाखाली होणाऱ्या ‘चलाखी’चा बुरखाच फाटला आहे.