बारावी पेपरफुटीचे प्रकरण : कोचिंग क्लास चालकासह दोघांना बेड्या; आणखी किती ठिकाणी गेली प्रश्नपत्रिका ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:48 IST2026-02-23T16:44:00+5:302026-02-23T16:48:55+5:30
बारावी पेपरफुटीचे प्रकरण : विभागीय शिक्षण मंडळातील कुणी सहभागी आहे का या दिशेने पोलिसांचा तपास सुरू

Class 12th paper leak case: Two people including the coaching class driver were arrested; How many other places did the question paper leak to?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बारावी पेपरफूट प्रकरणात कोचिंग क्लास चालकासह दोघांना गजाआड करण्यात आले आहे. दुसरा आरोपी कोचिंग क्लासमधील विद्यार्थी आहे. या दोघांकडे प्रश्नपत्रिका नेमकी कुठून आली व विभागीय शिक्षण मंडळातील कुणी यात सहभागी होते का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
निशिकांत मूल (४५, मानकापूर) व फरहान अख्तर (१९, कामगारनगर), अशी आरोपींची नावे आहेत. सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्मूला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर बुधवारी (दि. १८) रसायनशास्त्राचा पेपर होता. तेथील एक विद्यार्थिनी साधारणतः बारा वाजण्याच्या सुमारास प्रसाधनगृहात गेली. सुमारे १५ मिनिटे ती वर्गात न आल्याने केंद्रावरील पर्यवेक्षकांना संशय आला. तिची झडती घेतली असता एक स्मार्ट फोन आढळला. तो जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर आलेला होता. तसेच त्याच ग्रुपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली होती. संबंधित विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीचेही नाव सांगितले. दोघींचीही चौकशी केली असता त्या एकाच व्हॉट्सअॅप ग्रुपवर असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थिनींच्या मोबाइलमध्ये १६ फेब्रुवारी रोजी झालेला भौतिकशास्त्राचाही पेपर सापडला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल दहिफळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला होता.
'एक्सआयआय' या २१ सदस्य असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर या क्रमांकावरून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. संबंधित क्रमांक निशिकांत मूल याचा होता. मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यापासून फोन क्रमांक बंद होता. मात्र तांत्रिक पद्धतीने तपास करत पोलिसांनी निशिकांत मूल व फरहान अख्तर यांना ताब्यात घेतले. फरहान हा निशिकांतच्याच कोचिंग क्लासमध्ये होता. फरहानने व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेची उत्तरे टाकली होती. दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आणखी किती ठिकाणी गेली प्रश्नपत्रिका ?
निशिकांतकडे प्रश्नपत्रिका कुठून आली व अशा माध्यमातून ती आणखी विद्यार्थी किंवा शिक्षकांपर्यंत गेली होती का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दोघांच्या चौकशीतून बरेच तपशील बाहेर येऊ शकतात.