'फ्लाय ॲश' वाहतुकीच्या विरोधात खापरखेडा येथे नागरिक उतरले रस्त्यावर; वाहतूक कायमची बंद करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:31 IST2026-01-15T18:30:01+5:302026-01-15T18:31:11+5:30
Nagpur : या मार्गावर धावणाऱ्या इतर वाहनांच्या चाकांमुळे ती राख उडते-त्यामुळे वाहनचालकांसह रोडवर रहदारी करणारे नागरिक, दुकानदार, ग्राहक कर्मचाऱ्यांसह इतरांना या राखेचा रोज प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

Citizens take to the streets in Khaparkheda against 'fly ash' transport; demand permanent ban on transport
लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : स्थानिक मुख्य मार्गावरून वीज केंद्रातील राखेची (फ्लाय अॅश) रोज ट्रक व टिप्परद्वारे वाहतूक केली जाते. ही राख या मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग ते अण्णा मोडदरम्यान रोडवर मोठ्या प्रमाणात सांडत असल्याने तसेच ही राख मानवी व पशुपक्ष्यांच्या आरोग्यास हानिकारक असल्याने या राखीच्या वाहतुकीला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक बुधवारी (दि. १४) रस्त्यावर उतरले होते. खापरखेड्यातून होणारी ही राख वाहतूक कायमची बंद करून ती दुसऱ्या मार्गाने वळविण्याची आग्रही मागणी नागरिकांनी या आंदोलनादरम्यान केली.
दहेगाव (रंगारी) कामठी हा मार्ग खापरखेडा (ता. सावनेर) गावाच्या मध्यभागातून जात असून, या मार्गाचे काही वर्षापूर्वी चौपदरीकरण करण्यात आले आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला नागरिकांची घरे, विविध दुकानांसह शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका व इतर व्यापारी प्रतिष्ठाने आहेत तर एका बाजूला वीज प्रकल्प आहे. मागील काही वर्षापासून या मार्गावरून 'फ्लाय अॅश'ची ट्रक व टिप्परमधून वाहतूक केली जाते. वाहतुकीदरम्यान कुठलीही आवश्यक कळजी घेतली जात नसल्याने त्या ट्रक व टिप्परमधून रोडवर सांडत जात असल्याने खापरखेडा येथील रेल्वे क्रॉसिंग ते अन्नामोड रोडवर या राखेचे छोटे ढीग रोजच दिसून येतात.
या मार्गावर धावणाऱ्या इतर वाहनांच्या चाकांमुळे ती राख उडते-त्यामुळे वाहनचालकांसह रोडवर रहदारी करणारे नागरिक, दुकानदार, ग्राहक कर्मचाऱ्यांसह इतरांना या राखेचा रोज प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या राखेमुळे रोडवर खरेदी करण्यासाठी जाण्याची हिंमत होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले असून, धंद्यावर विपरीत परिणाम झाल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. या समस्येला महाजेनको प्रशासन जबाबदार असून, या समस्येतून कायमची सुटका मिळावी. यासाठी आंदोलन करीत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
मानवी व पशुपक्ष्यांच्या आरोग्यास घातक
या फ्लाय अँशमध्ये सिलिका, आर्सेनिक, शिसे, पारा, कॅडमियम, क्रोमियम, सेलेनियम, अॅल्युमिनियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, युरेनियम, थोरियम आदी विषारी व घातक घटक असतात. ही राख श्वासाद्वारे फुफ्फुसात गेल्यास सिलिकोसिस नामक फुफ्फसाच्या आजारासह अस्थमा, ब्रॉन्कायटिस, अॅलर्जिक सर्दी, खोकला व श्वसनाचे तसेच त्वचा व डोळ्यांचे आजार होतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ही राख पशुपक्षी, झाडे व मातीच्या आरोग्यास घातक असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
महाजेनको प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये रोष
या आंदोलनादरम्यान महाजेनको प्रशासनाविरुद्ध नागरिकांच्या मनात तीव्र रोष दिसून आला. आंदोलकांना शांत करण्यासाठी आंदोलनस्थळी आलेल्या वीज प्रकल्पातील अधिकाऱ्यांनाही या रोषाला सामोरे जावे लागले. खापरखेड्याच्या मध्यभागातून केली जाणारी फ्लाय अॅशची वाहतूक टी पॉइंटपासून कायमची बंद करावी, या वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, या मागण्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश खापरे, पंचायत समितीचे माती सभापती राहुल तिवारी यांनी केल्या. या समस्येवर वेळीच योग्य तोडगा काढला नाही तर पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या दोन नेत्यांसह नागरिकांनी दिला.