शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला केंद्राचे समर्थन नाही

By Admin | Updated: August 24, 2016 02:52 IST2016-08-24T02:52:28+5:302016-08-24T02:52:28+5:30

संपुआ शासनाने २००८ साली शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही मतांच्या उद्देशातून दिली होती. परंतु आमची भूमिका ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या

Center does not support the farmers' debt waiver | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला केंद्राचे समर्थन नाही

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला केंद्राचे समर्थन नाही

केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार : देशात स्वस्ताई असल्याचाही दावा
नागपूर : संपुआ शासनाने २००८ साली शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही मतांच्या उद्देशातून दिली होती. परंतु आमची भूमिका ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या समर्थनार्थ नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी केले. भाजपाच्या विभागीय कार्यायलयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. सामान्य मनुष्याचे महागाईने कंबरडे मोडले असताना देशात डाळ सोडून सर्वच स्वस्त असल्याचा दावादेखील त्यांनी केला.
देशात डाळ सोडली तर गहू, तांदूळ, तेल इत्यादी गोष्टी स्वस्त आहेत. डाळीचे उत्पादनच कमी झाले आहे. डाळीच्या पिकाला नीलगाय तसेच इतर जनावरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कि मती वाढलेल्या आहेत. परंतु उत्पादन वाढवून आणि आयात केल्याने डाळीच्या किमती नियंत्रित होऊ शकतात. डाळीच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रभावी पावले उचलत आहे, असेदेखील ते म्हणाले. गहू, तांदूळ यांचे भाव वाढलेले नाहीत. त्यामुळे या गोष्टी महाग झाल्या आहेत, असे म्हणणे योग्य होणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

जावडेकरांच्या वक्तव्यावर मौन
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यलढ्यात फासावर गेले होते, असे वादग्रस्त वक्तव्य दिले होते. यावर गंगवार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.
पटेल यांची निवड योग्यच
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी उर्जित पटेल यांची झालेली निवड योग्यच आहे. त्यावर शंका घेण्याचे कारण नाही, असे गंगवार म्हणाले. रघुराम राजन यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना हटविण्यात आलेले नाही. उर्जित पटेल देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देतील, असा विश्वास गंगवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Center does not support the farmers' debt waiver