अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण ; उद्योजक मनोज जयस्वालसह चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:11 IST2025-09-30T14:10:40+5:302025-09-30T14:11:16+5:30
Nagpur : अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

CBI officers who came to arrest were beaten up; Four people including businessman Manoj Jaiswal booked
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोट्यवधी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोलकाता युनिटने कारवाई करताना शहरातील उद्योजक मनोज जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला. अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१९ सप्टेंबर रोजी सीबीआयचे पथक मनोज जयस्वाल यांना अटक करण्यासाठी नागपुरात आले होते. रामदासपेठ येथील हॉटेल तुली इम्पिरियलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक पोहोचले. अटक वॉरंट दाखवताच जयस्वाल आणि त्यांचे साथीदार अधिकाऱ्यांशी उलट बोलू लागले. त्यांनी अपशब्द वापरत कारवाईला विरोध केला. निरीक्षक सौरभकुमार सिंह यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना मारहाण केली.
अखेर सिंह यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे व मारहाण करणे या कारणावरून गुन्हा नोंदविला आहे.
आरोपींमध्ये मनोज कुमार जयस्वाल, दिलीप कुमार सुखदेव साहू (रा. जे.पी. हाइट्स, आरबीआय ऑफिसर कॉलनी, बैरामजी टाउन), त्रिलोकसिंह जगतसिंह (रा. विनायक दर्शन बिल्डिंग, सेंट्रल पार्क) तसेच त्यांच्या एका साथीदाराचा समावेश आहे.