लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भाड्याच्या पैशाचा वाद झाल्यानंतर प्रवाशाने दारूची बाटली ऑटो चालकाच्या डोक्यावर फोडली. त्यामुळे उमेश मुकुंदा ढाकळे (वय ३१) नामक ऑटोचालक जबर जखमी झाला. बाबूळखेडा मानवता शाळेजवळ सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.
ढाकळेच्या तक्रारीनुसार, बेलतरोडी टी पॉईंट जवळून त्याच्या ऑटोत रत्नदीप कार्तिक कस्तुरे (वय २९, रा. बेलतरोडी) हा बसला. नियोजित ठिकाणी उतरल्यानंतर भाड्याच्या पैशावरून ढाकळे आणि कस्तुरेत वाद झाला. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर आरोपी कस्तुरेने जवळची काचेची बाटली काढून फिर्यादीच्या डोक्यावर मारली आणि त्याला जबर दुखापत केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. जखमी ढाकळेने बेलतरोडी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----