लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १५१ सदस्यीय नागपूर महापालिकेत भाजपकडे १०२ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौरांची निवड बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, काँग्रेसनेही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता काँग्रेसने उमेदवारी मागे न घेतल्यास महापौरपदासाठी भाजपच्या नीता ठाकरे आणि काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांच्यात थेट लढत होईल. भाजपकडून उपमहापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक अॅड. संजय बालपांडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. बालपांडे मात्र स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. शेवटी पक्षांकडून नकार मिळाल्याने त्यांनी उपमहापौरपदाची निवडणूक लढण्यास नकार दर्शविला. दरम्यान उपमहापौरपदासाठी भाजपतर्फे लीला हाथीबेड, तर काँग्रेसकडून विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केले. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. मात्र, त्यानंतरही काँग्रेसने उमेदवारी दाखल करत ही निवडणूक अविरोध होणार नाही याची काळजी घेतली आहे.
महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार असून, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत सहा सदस्य असलेली एमआयएम, चार सदस्यांची मुस्लीम लीग आणि बसपचा एक सदस्य कोणाच्या बाजूने कौल देतात की तटस्थ राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर भाजपकडून नीता ठाकरे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. सोमवारी भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी महापौर व उपमहापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार नीता ठाकरे यांच्याकडे महापौर तर लीला हातीबेड यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. स्थायी समिती सभापतिपद महिलेलाच दिले जाणार असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. त्यानुसार समितीची जबाबदारी शिवानी दाणी यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नीता ठाकरे या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग २८ मधून निवडून आल्या आहेत. गेल्या २० वर्षांनंतर दक्षिण नागपूरला महापौरपद मिळणार असून, ज्येष्ठता लक्षात घेऊन पक्षाने त्यांना पसंती दिल्याचे सांगण्यात येते.
उपमहापौरपदासाठी इच्छुक असलेले संजय बालपांडे यांनी नकार दिल्याने पक्षाने लीला हातीबेड यांची निवड केली. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच नरेंद्र बोरकर यांची सत्तापक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील प्रभागातून निवडून आलेल्या शिवानी दाणी यांच्याकडे स्थायी समितीची धुरा सोपविण्यात येणार असून, त्या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
स्थायी समिती अध्यक्षपद शिवानी दाणींकडे जाणार
भाजप शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना बंधनकारक असते. भाजपच्या संसदीय समितीने उपमहापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक अॅड. संजय बालपांडे यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, बालपांडे यांनी उपमहापौरपद घेण्यास पक्षाला नकार दिला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संसदीय समितीने स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवानी दाणी यांचे नाव निश्चित केल्याने बालपांडे यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे त्यांनी उपमहापौरपद नाकारल्याची चर्चा आहे. बालपांडे यांनी नकार दिल्याने शेवटी भाजपने वेगळा पर्याय शोधला.
भाजपच्या १०२ नगरसेवकांची गटनोंदणी
महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोमवारी सकाळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे भाजपच्या १०२ नगरसेवकांनी गटनोंदणी करण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार गिरीश व्यास, अनिल सोले, विकास कुंभारे, मनपातील सत्तापक्षनेते नरेंद्र बोरकर, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.
मनपा इतिहासात प्रथमच तिन्ही प्रमुख पदांवर महिला
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष अशा तिन्ही महत्त्वाच्या पदांवर महिलांची वर्णी लागणार आहे.
Web Summary : Nita Thackeray is likely to be Nagpur's next mayor. Despite BJP's majority, Congress is contesting. Thackeray will face Congress' Snehal Thackeray. Leela Hatibed is BJP's deputy mayor candidate. For the first time, all three key municipal posts will be held by women.
Web Summary : नीता ठाकरे नागपुर की अगली महापौर बनने की संभावना है। भाजपा के बहुमत के बावजूद, कांग्रेस चुनाव लड़ रही है। ठाकरे का मुकाबला कांग्रेस की स्नेहल ठाकरे से होगा। लीला हाथीबेड भाजपा की उप महापौर उम्मीदवार हैं। पहली बार, तीनों प्रमुख नगरपालिका पद महिलाओं के पास होंगे।