नागपूर रेल्वे स्थानकावर भिकाऱ्यांना स्थान नाही; एकाच दिवशी ४५ भिकाऱ्यांना दाखविला बाहेरचा रस्ता
By नरेश डोंगरे | Updated: October 10, 2025 20:11 IST2025-10-10T20:09:11+5:302025-10-10T20:11:32+5:30
'भिकारी हटाव मोहिम' : विशेष मोहिमेसाठी विशेष पथक

Beggars have no place at Nagpur railway station; 45 beggars shown the way out in a single day
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासन आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या रेल्वे स्थानकाच्या आत-बाहेरच्या भिकाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
रेल्वे स्थानक परिसराची वारंवार स्वच्छता करूनही काही भिकारी, निराधार व्यक्ती आतमधील परिसरात ठिय्या मांडून तो परिसर घाणेरडा करतात. त्यांच्यामुळे प्रवाशांनाही त्रास होतो आणि रेल्वे प्रशासनासाठीही हा विषय डोकेदुखीचा ठरला आहे. त्यांना वारंवार बाहेरचा रस्ता दाखविला तरी ते काही वेळेनंतर परत रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये येऊन बसतात आणि परत उपद्रव करतात. ते ध्यानात घेऊन भिकाऱ्यांवर विशेष कारवाईची मोहिम सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेतला. त्यासाठी एका विशेष पथकाचीही निर्मिती करण्यात आली.
रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे कर्मचारी, तिकिट तपासणीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान यांचा या पथकात समावेश करून शुक्रवारी सकाळपासून रेल्वे स्थानकाच्या आत-बाहेर 'भिकारी हटाव' मोहिम सुरू करण्यात आली. त्यानुसार, विविध प्लॅटफॉर्म, फूट-ओव्हर ब्रिज, प्रतीक्षालय, तिकीट बुकिंग क्षेत्र तसेच बाहेरच्या परिसरात असलेल्या भिकाऱ्यांना दिवसभरात हुडकून काढण्यात आले. एकूण ४५ भिकाऱ्यांना रेल्वे स्थानक परिसरातून बाहेर हुसकावून लावण्यात आले. यात रेल्वे स्थानक परिसरात कचरा गोळा करणारांचाही समावेश होता.
झिरो टॉलेरन्सची भूमीका
रेल्वे स्थानकाचा परिसर स्वच्छ असावा, प्रवाशांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ही भिकारी हटाव मोहिम सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही भिकारी नशेडी देखिल असतात. ते आपले व्यसन भागविण्यासाठी प्रवाशांना त्रास देतात. प्रसंगी छोट्या-मोठ्या चिजवस्तूंची चोरीही करतात. आता यापुढे हे प्रकार रेल्वे स्थानकावर होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असून, त्यासाठी झिरो टॉलरन्सची भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.