मेडिकलच्या ॲडमिशनची थाप, पाच लाख रुपये उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:07 AM2021-02-14T04:07:47+5:302021-02-14T04:07:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेडिकलमध्ये ॲडमिशन करून देतो, अशी थाप मारून दोन भामट्यांनी एका व्यक्तीकडून पाच लाख रुपये ...

Beat of medical admission, boiled five lakh rupees | मेडिकलच्या ॲडमिशनची थाप, पाच लाख रुपये उकळले

मेडिकलच्या ॲडमिशनची थाप, पाच लाख रुपये उकळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेडिकलमध्ये ॲडमिशन करून देतो, अशी थाप मारून दोन भामट्यांनी एका व्यक्तीकडून पाच लाख रुपये उकळले. एवढेच नव्हे तर पीडित व्यक्तीच्या बनावट सह्या असलेला स्टॅम्प तयार करून त्या आधारे रक्कम परत केल्याचा आरोपींनी कांगावा केला. आरोपीची थापेबाजी लक्षात आल्याने पीडिताने लकडगंज पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार नोंदवली. रवी लखन परियाल (वय ३५, रा.भामटीपुरा, वर्धा) आणि अमोल नारायण मस्के (वय ४०, रा. अर्पण अपार्टमेंट, नालवाडी वर्धा) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

प्रताप जयकिशन कंजवानी (वय ४५) हे समाधान आश्रम मार्गावर राहतात. त्यांच्या मेव्हण्याची आरोपींसोबत ओळख आहे. आरोपी परियाल आणि मस्के हे दोघे मेडिकलमध्ये एमबीबीएसची ॲडमिशन करून देतो, अशी बतावणी करत फिरतात. कंजवानी यांना त्यांच्या मुलीची एमबीबीएसला ॲडमिशन करायची असल्याने त्यांच्या मेव्हण्याने आरोपी परियालचा मोबाइल नंबर ६ जुलै २०१९ ला कंजवानी यांना दिला होता. त्यावेळी कंजवानी यांनी परियालकडे मुलीच्या ॲडमिशनसंबंधाने चाैकशी केली. त्यानंतर त्याला छापरूनगर गार्डनजवळ बोलवून त्याच्यासोबत चर्चा केली. यावेळी आरोपीने आपले वरपर्यंत धागेदोरे असल्याची थाप मारून शंभर टक्के ॲडमिशन होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यासाठी त्याने १५ लाख रुपयांची मागणी केली होती. कंजवानी यांनी दोन दिवसांनंतर पुन्हा परियालसोबत संपर्क साधला असता त्याने आपल्या वर्धा येथील महाराष्ट्र बँकेच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कंजवानीयांनी ही रक्कम जमा केली. त्यानंतर आरोपी परियाल आणि त्याचा साथीदार मस्के या दोघांनी वेगवेगळे कारण सांगून कंजवानींना बरेच दिवस टाळले. मात्र कंजवानी यांच्या मुलीची एमबीबीएसला ॲडमिशन करून दिली नाही. दिलेले पाच लाख रुपये परत मागितले असता ते पण परत केले नाहीत. एवढेच नव्हे तर आरोपींनी एका स्टॅम्प पेपरवर रक्कम परत केल्याचा लेख लिहून त्यावर कंजवानी यांच्या बनावट सह्या केल्या. तो स्टॅम्पपेपर दाखवून आरोपी कंजवानी यांची बोळवण करू लागले. ते रक्कम परत करणार नाहीत, त्यांनी फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने कंजवानी यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चाैकशी करून शुक्रवारी या प्रकरणात फसवणुकीच्या विविध कलमांची नोंद करून गुन्हा दाखल केला.

पोलीस पथक वर्ध्याला जाणार

दोन्ही आरोपी वर्ध्याला राहतात. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथक वर्ध्याला जाणार असल्याची माहिती लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे यांनी दिली.

----

Web Title: Beat of medical admission, boiled five lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.