‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
By योगेश पांडे | Updated: October 24, 2025 18:08 IST2025-10-24T18:06:01+5:302025-10-24T18:08:02+5:30
Nagpur : माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आमच्या कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअप ग्रुप्सवर येणाऱ्या कमेंट्सवर लक्ष ठेवण्यात येते. पक्षाचे व्हाट्सअप ग्रुप आहेत त्यावर कार्यकर्ते असतात.

Bawankule's steps back on the issue of 'mobile surveillance', claims to have spoken about WhatsApp groups
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वांचे सोशल मीडियावर ‘सर्व्हेलन्स’ सुरू असल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता सारवासारव केली आहे. आमच्या पक्षाचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्या माध्यमातून पक्षाकडून जनतेशी संपर्क ठेवण्यात येतो व त्यावरील कमेंट्सवर लक्ष ठेवण्यात येते. याच माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाददेखील साधल्या जातो असे बावनकुळे म्हणाले. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आमच्या कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअप ग्रुप्सवर येणाऱ्या कमेंट्सवर लक्ष ठेवण्यात येते. पक्षाचे व्हाट्सअप ग्रुप आहेत त्यावर कार्यकर्ते असतात. सरकारी योजनांच्या प्रचार प्रसाराचे मॉनिटरिंग करण्यात येते. आमच्या पक्षाचेच एक लाखाहून अधिक व्हॉट्सअप ग्रुप आहेत. प्रत्येक बूथप्रमुखांचा व्हाट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूम सोबत जोडल्या गेला आहे. या माध्यमातून प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवण्यात येते व जनतेच्या समस्या दूर करण्यावर भर देण्यात येतो असे बावनकुळे म्हणाले. आमच्या पक्षात आम्ही काय करावे हे ठरवणारे संजय राऊत कोण आहेत असा सवाल करत त्यांच्या बोलण्याला फारशी किंमत नाही असे ते म्हणाले.
नाना पटोले भाजपच्या संपर्कात नाही
नाना पटोले भाजपात येणार का याबाबत विचारले असता बावनकुळे यांनी त्याचे खंडन केले. नाना पटोळे यांच्या व्यक्तिमत्त्वावर असल्या कुठल्याही प्रकारच्या संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाहीय नाना पटोले भाजपच्या संपर्कात नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. बरेच नेते- कार्यकर्ते भाजपमध्ये येण्याची इच्छा नेहमी व्यक्त करतात. काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये येण्याचा विचार करत आहेत. काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही, चर्चा करत नाही. बरेच चांगले पदाधिकारी हे बाजूला पडलेले आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.
महायुतीत मतभेद होतील असे वक्तव्य नको
महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही असं कुठलाही व्यक्तव्य करायचे नाही असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदेदेखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना असेच निर्देश देतील. आपला विरोधक कोण आहे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांना समजले पाहिजे. आपण सरकारमध्ये काम करतोय. आमच्याकडे असेल किंवा त्यांच्याकडे असेल प्रमुख नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले. धंगेकर हे स्थानिक राजकारणात मुरलीधर मोहोळ यांना आपला विरोधक समजत आहेत. आम्ही धंगेकरांवर कुठलीही कारवाई करण्याची मागणी केलेली नाही, असेदेखील ते म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात तीन नेत्यांची समिती
महायुतीसंदर्भात प्रत्येक जिल्ह्यात तीन-तीन नेत्यांची समिती बनवलेली आहे ज्या ठिकाणी दोन कार्यकर्ते तुल्यबळ आहेत तिथे आपसात लढतील. मात्र मनभेद व मतभेद होणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल, असे बावनकुळे यांनी प्रतिपादन केले.