दिल्ली स्फोटातील बांगलादेशी कनेक्शन ? हावडा मार्गे येणाऱ्या अनेक गाड्या तपास यंत्रणांच्या रडारवर
By नरेश डोंगरे | Updated: November 18, 2025 20:41 IST2025-11-18T19:42:51+5:302025-11-18T20:41:57+5:30
Nagpur : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला सायंकाळी दहशतवादी उमर उन नबी याने कारमध्ये स्फोट घडवून आणला. ज्यात १२ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुमारे दोन डझन नागरिक जखमी झाले.

Bangladeshi connection in Delhi blasts? Many trains coming via Howrah on the radar of investigative agencies
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीच्या स्फोटात बांगलादेश कनेक्शन उघड झाल्यानंतर आता संशयीत बांगलादेशी रडारवर आले आहेत. त्यामुळे नजरेत आलेल्यांच्या हालचालीवर सूक्ष्म नजर ठेवण्याचे निर्देश तपास यंत्रणांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूरसह विविध रेल्वे स्थानकांवर पश्चिम बंगालकडून येणाऱ्या गाड्यांतील प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला सायंकाळी दहशतवादी उमर उन नबी याने कारमध्ये स्फोट घडवून आणला. ज्यात १२ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुमारे दोन डझन नागरिक जखमी झाले. भारतातील या आत्मघाती हल्ल्याच्या कटात बांगलादेशी कनेक्शन असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात उघड झाले आहे. घातपाताच्या कटानुसार अनेक तरुणांना जैश-ए-मोहम्मद या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा ओव्हर ग्राउंड वर्कर (ओजीडब्ल्यू) बनवण्याचेही प्रयत्न झाले आहेत. दिल्लीतील स्फोटाचा सूत्रधार, आत्मघाती दहशतवादी डॉ. उमर उन नबी याने स्फोटापूर्वी अनेकांचे ब्रेनवॉश करून आत्मघाती हल्ल्यासाठी त्यांना तयार करण्याचे प्रयत्न केल्याचेही तपासातून उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, संशयीत आणि बांगलादेशींच्या हालचालींवर सूक्ष्म नजर ठेवण्याचे आदेश सर्वच तपास यंत्रणांना देण्यात आले आहे. त्यानुसार, एटीएसकडून ठिकठिकाणचे संशयीत तपासले जात आहेत.
विशेष म्हणजे, सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर कोलकाता (पश्चिम बंगाल)मधून देशाच्या विविध भागांत जातात. त्यामुळे पश्चिम बंगालमधून येणाऱ्या रेल्वे गाड्यांची नागपूरसह देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) कसून तपासणी केली जात आहे. एकट्या नागपूर रेल्वे स्थानकाचा विचार केल्यास हावडाकडून नागपूर मार्गे दिवसभरात १६ सुपरफास्ट, एक्सप्रेस गाड्या येतात. यातील प्रवाशांची तपासणी आणि चाैकशी केली जात आहे.
''नागपूर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या सर्वच्या सर्व मोठ्या रेल्वे स्थानकांवर स्फोटानंतर हावडाकडून येणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. या गाड्यांमध्ये बांगलादेशी, तसेच दुसऱ्या संशयीतांचीही कसून चाैकशी केली जात आहे''.
- मंगेश शिंदे, एसपी, रेल्वे पोलिस, नागपूर विभाग.