Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
By योगेश पांडे | Updated: October 29, 2025 23:42 IST2025-10-29T23:37:35+5:302025-10-29T23:42:17+5:30
Bacchu Kadu Morcha Latest News: बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले असून, गुरुवारी मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पण, अपेक्षित निर्णय झाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याबद्दल बच्चू कडूंनी मोठी घोषणा केली.

Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
-योगेश पांडे, नागपूर
कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंंदोलनाची कोंडी तात्पुरती फुटली आहे. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी मुंबईत जाऊन चर्चेची तयारी दाखविली आहे. मात्र तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलन आता नियोजित मैदानावर होणार असून वर्धा मार्गावर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे ३० तासांपासून वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागपुरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुमारे दहा हजारांहून आंदोलक सहभागी झाले होते. त्यामुळे वर्धा मार्ग बंद झाला व अभूतपुर्व कोंडीचा फटका हजारो नागरिकांना बसला. आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर राज्यमंत्री पंकज भोयर व ॲड.आशीष जयस्वाल हे नागपुरच्या दिशेने निघाले.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी बुधवारी जनतेला होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कडू व इतर आंदोलकांना वर्धा रोड व इतर सर्व रस्ते तातडीने मोकळे करण्याचा आदेश दिला. रोड मोकळे करताना कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता भंग करू नका, असेही आदेश न्यायालयाने बजावले.
कडू यांच्यासह इतर आंदोलनकर्ते स्वत:हून हटत नसतील तर, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, महामार्ग वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना हटविण्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक कारवाई करावी आणि रोड मोकळे करून वाहतूक सुरळीत करावी, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयाचा आदेश कडू यांच्यापर्यंत पोहोचवला. कडू यांनी स्वत:हून रोड मोकळा करणार नाही, पोलिसांनीच आंदोलनकर्त्यांना कारागृहात टाकून रोड मोकळा करून घ्यावा, अशी भूमिका घेतली.
राज्यमंत्र्यांसोबत बोलणे आणि चर्चेसाठी तयार
दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दोन्ही राज्यमंत्री खापरी परिसरात पोहोचले. तेथे बच्चू कडू व इतर आंदोलकदेखील पोहोचले. आंदोलकांनी कर्जमाफीबाबत तेथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून विचारणा करा अशी भूमिका घेतली.
अखेर राज्यमंत्र्यांनी बाजुला जाऊन मुख्यमंत्र्यांशी बोलणे केले व कडू तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना चर्चेसाठी मुंबईला येण्याची विनंती केली. कडू व त्यांचे सहकारी चर्चेला तयार झाले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, अ.भा.किसान सभेचे राजन क्षीरसागर यांचादेखील समावेश होता.
...तर होणार रेल्वे रोको
दोन्ही राज्यमंत्र्यांसमोरच कडू यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मुंबईत जाऊन चर्चा होईपर्यंत शेतकरी आंदोलन कायम राहील. आंदोलनकर्ते नियोजित मैदानावर बसून निदर्शने करतील व महामार्ग मोकळा करतील असे कडू यांनी स्पष्ट केले. मात्र कर्जमाफी लागू करण्याच्या अंमलबजावणीची अंतिम तारीख सरकारने जाहीर केली नाही तर ३१ ऑक्टोबरपासून रेल्वे रोको करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
असे आहेत हायकोर्टाचे इतर आदेश
१) आंदोलनकर्त्यांनी रोड मोकळा करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. पोलिसांनी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, महिला व मुले यांना सन्मानपूर्वक बाहेर काढावे.
२) बेलतरोडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आंदोलनाकरिता २६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या परवानगीचे उल्लंघन झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर कायद्यानुसार कारवाई करावी. पोलिस आयुक्तांनी गुरुवारच्या सकाळी ११ वाजेपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल द्यावा.
३) पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महामार्ग वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक व बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करावे.