बाबासाहेब जागतिक स्त्रीमुक्तीचे उद्धारक

By admin | Published: June 20, 2016 02:47 AM2016-06-20T02:47:34+5:302016-06-20T02:47:34+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील स्त्रीमुक्तीचे उद्धारक आहेत. त्यामुळे जगभरातील महिलांनी त्यांचे ऋण मानावे, ...

Babasaheb's World Refugee of Women's Liberation | बाबासाहेब जागतिक स्त्रीमुक्तीचे उद्धारक

बाबासाहेब जागतिक स्त्रीमुक्तीचे उद्धारक

Next

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन : प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे प्रतिपादन
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील स्त्रीमुक्तीचे उद्धारक आहेत. त्यामुळे जगभरातील महिलांनी त्यांचे ऋण मानावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी येथे केले.
प्रगतिशील लेखक संघ, संविधान फाऊंडेशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृतभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ. जब्बार पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते तर भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख अतिथी होते. ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो, संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील, सुनीता झाडे व महेंद्रकुमार मेश्राम व्यासपीठावर होते.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, महिलांच्या अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका झटक्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर महिलांसाठी सुटी लागू केली.
राज्यघटना तयार करणारा, आरक्षण मिळवून देणारा, गांधीजींशी भांडणारा माणूस म्हणून बाबासाहेब आपल्याला परिचित होते. परंतु बाबासाहेबांवर चित्रपट करीत असताना जेव्हा देशभरासह जगभरात फिरलो तेव्हा बाबासाहेब काय होते, हे खऱ्या अर्थाने कळले. तेव्हा बाबासाहेब समजून घेताना एकेक धक्का बसत गेला. इतक्या मोठ्या उंचीचे ते व्यक्तिमत्त्व होते. कोलंबिया विद्यापीठात जेव्हा मी बाबासाहेबांवर चित्रपट करीत असल्याचे समजले तेव्हा तेथील प्रशासनाने आपल्याकडून एक पैसाही न घेता संपूर्ण मदत केली. तेव्हा त्यांच्या मनात बाबासाहेबांबद्दल किती सन्मान आहे, हे दिसून आले.
राज्यघटनेला ५० वर्षे पूर्ण झाली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ, अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लंडचे सर्वोच्च न्यायाधीश होते. त्या चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षरसुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले होते. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते, असेही डॉ. पटेल यांनी स्पष्ट केले. ई.झेड. खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी भूमिका विशद केली. अजय गंपावार यांनी संचालन केले, तर प्रसेनजित ताकसांडे यांनी आभार मानले.
समारोपाला ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी होते. ई. झेड. खोब्रागडे, सुनील पाटील,डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, इंद्रजित ओरके व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)

गांधींविरुद्ध आंबेडकर हे आरएसएसचे षङ्यंत्र
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष हा वैचारिक होता. परंतु या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांना घडविले आहे. हा इतिहास आहे. परंतु गांधींविरुद्ध आंबेडकर असे भांडण लावून आपसात लढवत ठेवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षङ्यंत्र आहे, हे षङ्यंत्र हाणून पाडा, असे आवाहन डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

सोशल मीडियामध्ये ‘इंटेलेक्च्युअल फोरम’ तयार व्हावा
आज बाबासाहेबांच्या विचारांवर घाला घालण्याचे प्रकार होत असेल तर त्याविरोधात प्रखरतेने बोलले गेले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारवंतांनी व अनुयायांनी एकजुटीने बोलावे. यासाठी सोशल मीडियावर एक इंटेलेक्च्युअल फोरम तयार व्हावा. एखाद्याने चुकीचे विचार मांडले असेल तर त्याला तर्कसंगतपणे उत्तर दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.

Web Title: Babasaheb's World Refugee of Women's Liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.