'आज याचा खूनच करू' म्हणत एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या मित्राला संपवण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 18:53 IST2025-11-26T18:52:13+5:302025-11-26T18:53:17+5:30
Nagpur : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Attempt to kill girlfriend's friend out of one-sided love, saying 'I'll kill him today'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका आरोपीने सहकाऱ्यांच्या मदतीने भर वस्तीत तरुणाचा गळा कापून जीव घेण्याचा प्रयत्न केला. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नॅव्ही देवेंद्र रामटेके (२१, नंदनवन झोपडपट्टी) असे जखमीचे नाव आहे. तो शिक्षण घेत आहे. सहा महिन्यांपासून त्याची एका तरुणीशी मैत्री आहे. संबंधित तरुणी अगोदर संकेत वंजारी (२४, कवेलू क्वॉर्टर्स, नंदनवन) याची मैत्रीण होती. मात्र त्याच्यासोबत वाद होत असल्याने तिने संपर्क तोडला. मात्र संकेत सातत्याने तिच्या मागे लागत होता व त्याला ती नॅव्हीसोबत बोलते हे पटत नव्हते. त्यावरून त्याने अनेकदा फोनवर तिला धमकीदेखील दिली होती. २४ नोव्हेंबर रोजी त्याने रात्री १० वाजता नॅव्हीला फोनवर धमकी दिली. तसेच त्याचा मित्र वैभव अशोक तान्नेलवार (३०, वृंदावननगर, नंदनवन) याने त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
रात्री पावणेअकरा वाजता नॅव्ही केडीके कॉलेज मार्गावर मित्रांसोबत उभा होता. तेव्हा तेथे संकेत दोन साथीदारांसोबत पोहोचला व शिवीगाळ करत नॅव्हीला मारहाण केली. काही वेळातच वैभवदेखील पोहोचला व आज याचा खूनच करू, असे म्हणत संकेतच्या हातात चाकू दिला. त्याच्या सांगण्यावरून संकेतने नॅव्हीच्या गळ्यावर चाकूने वार केले. नॅव्हीच्या गळ्यातून रक्त वाहू लागले व त्याच्या किंकाळ्या ऐकून वस्तीतील लोकांनी धाव घेतली. तेव्हा आरोपी तेथून फरार झाले. नॅव्हीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून संकेत, वैभव यांच्यासह आणखी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.