लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट शालार्थ आयडीद्वारे नियुक्ती झालेल्या नागपुरातील दोन लिपिकांना अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. या अटकेनंतर आता या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या २० झाली आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील प्रमुख 'लिंक' असलेल्या नीलेश वाघमारेची कसून चौकशी सुरू असून त्याने काही अधिकारी व संस्थाचालकांची नावे घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अटकसत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बनावट शालार्थ आयडी प्रकरणात रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. एसआयटीकडूनदेखील विविध 'लिंक्स' शोधण्यावर भर देण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान हुडकेश्वर येथील श्रावणजी वाटकर उच्च प्राथमिक शाळेतील कनिष्ठ लिपिक मंगेश केशव निनावे (३५) व नंदनवनमधील केशवनगर उच्च प्राथमिक शाळेतील कनिष्ठ लिपिक मनीषकुमार केशव निनावे (३२) यांची नावे समोर आली. दोघेही सख्खे भाऊ असून त्यांचे राहणे ओंकारनगर येथील प्रज्योती कोर्ट अपार्टमेंट येथे राहणे आहे. या दोघांचीही नियुक्ती बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून झाली होती. मंगेशची नियुक्ती मार्च २०२३ मध्ये झाली होती. तर मनीषकुमार हा जुलै २०१९ पासून नोकरीवर लागला होता. या दोघांनीही त्यांच्या नोकरीच्या या कार्यकाळात ४१ लाख ४९ हजार इतके वेतन घेतले. त्यांनी अधिकारी व दलालांच्या माध्यमातून बोगस शालार्थ आयडी तयार करवून घेतला होता. चौकशीतून ही बाब स्पष्ट होताच पोलिसांनी दोघांनाही रविवारी अटक केली. या दोघांच्या चौकशीतून आता आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.
'अब तक २०'दरम्यान, केवळ बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक झालेल्यांची संख्या २० इतकी झाली आहे. यात तीन शिक्षण उपसंचालक, तीन शिक्षणाधिकारी, सहा लिपिक, दोन शाळा मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, तीन सहायक शिक्षक व वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे यांचा समावेश आहे.