Ajit Pawar Passed Away : कार्यकर्त्याला अडचणीत भक्कम साथ देणारे दादा; जेव्हा कार्यकर्त्याच्या चुकीवर संतापले..
By नरेश डोंगरे | Updated: January 28, 2026 20:05 IST2026-01-28T20:02:22+5:302026-01-28T20:05:54+5:30
Nagpur : पक्षाच्या कार्यकर्त्यावर नाहक कारवाई झाल्याची माहिती दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कळाली आणि त्यांच्यातील दादा जागा झाला. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कुणाच्या दबावात कारवाई केली, असा थेट प्रश्न करून जाब विचारला.

Ajit Pawar who strongly supported the worker in trouble; When he got angry at the worker's mistake..
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पक्षाच्या कार्यकर्त्यावर नाहक कारवाई झाल्याची माहिती दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कळाली आणि त्यांच्यातील दादा जागा झाला. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कुणाच्या दबावात कारवाई केली, असा थेट प्रश्न करून जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्याने माहिती दिली अन् वस्तुस्थिती कळताच दादांचे रूप बदलले. त्यांनी ज्या कार्यकर्त्यासाठी फोन केला होता, त्याच कार्यकर्त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्या पोलीस अधिकाऱ्याला दिले.
कुणीही असो, कायदा धाब्यावर बसविणाऱ्या कुणाचीच गय केली जाऊ नये, अशी भूमिका दादा घ्यायचे. २०२२ - २३ मध्ये असेच घडले. उमरेडमध्ये राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली होती. हा पदाधिकारी नेहमी अजितदादाची जवळीक असल्याचे दाखवून सामान्य नागरिक तसेच पोलिसांवर दडपण आणण्याचे प्रयत्न करायचा. अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालूनही त्या पदाधिकाऱ्याची रंगदारी सुरू होती. त्यामुळे त्यावेळी संपूर्ण उमरेड तालुक्यात नागरिकांचा रोष उफाळून आला होता.
पुराव्यानिशी तक्रार मिळाल्यानंतर तत्कालीन ग्रामीण पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वतः हे प्रकरण हाताळले आणि संबंधित व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीच्या चमच्यांनी दादांना चुकीची माहिती देऊन आपल्या कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची आणि पोलीस त्याच्यावर अन्याय करत असल्याची माहिती दिली.
चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला अडचणीत भक्कम साथ देणारे आणि प्रसंगी त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावणाऱ्या अजित दादांचा संताप त्यामुळे अनावर झाला. लगेच त्यांनी पोलीस अधीक्षकांना फोन करून जाब विचारला. अधीक्षकांनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आरोपीने अनेकांची फसवणूक करून लाखो रुपये हडपल्याचे आणि पीडितांमध्ये अनेक गोरगरीब असल्याची माहिती दिली. ही वस्तुस्थिती कळल्यानंतर अजित दादा बिथरले. त्यांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करा आणि नागरिकांचे पैसे परत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करा, असे निर्देश पोलीस अधिक्षकांना दिले. कोणी माझ्या नावावर कारवाईत हस्तक्षेप करत असेल किंवा दडपण आणत असेल तर थेट मला माहिती द्या. कुणाचीही मुलाहिजा बाळगू नका, असेही दादांनी पोलीस अधीक्षक मगर यांना सांगितले.
एकीकडे आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणारे दादा कार्यकर्ता जर आरोपी असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेण्यासाठी परिचित होते. दादा कायमचे निघून गेल्यावर असे अनेक किस्से विविध अधिकाऱ्यांनी आज लोकमतला सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट अन दादांची शिष्टाई
नागपुरात पोलीस भवनाची भव्य आणि आकर्षक वास्तू उभी राहावी, असे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होते. त्यानुसार तत्कालीन पोलीस आयुक्त व्यंकटेशम त्यांच्या कार्यकाळात या वस्तूचे भूमिपूजन झाले. त्यानंतर निवृत्त पोलीस महासंचालक आणि तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ही वास्तू तयार करून घेतली. वास्तु पूर्ण झाल्यानंतर येथे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेल्या अमितेशकुमार यांच्या कार्यकाळात या वास्तूचे लोकार्पण झाले.
पोलीस भवनाची डिझाईन तयार करताना या एकाच इमारतीत
पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक अशी दोन्ही कार्यालय राहणार, असे ठरले होते. नंतर मात्र इथे फक्त पोलीस आयुक्तांचेच कार्यालय राहील, अशी भूमिका काही अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय देखील याच वास्तूत राहावे अशी भूमिका घेऊन तशी गळ अजितदादा यांना घातली. त्यावरून दादांनी पुढाकार घेतला आणि २९ एप्रिल २०२२ ला अजित दादांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. अर्थात पोलीस भवनात आयुक्त तसेच अधीक्षक अशी दोन्ही कार्यालय सुरू झाली.