बिबट्याच्या चामड्यासह आरोपी अटकेत

By Admin | Updated: September 13, 2014 02:37 IST2014-09-13T02:37:01+5:302014-09-13T02:37:01+5:30

वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भिवापूर येथे बिबट्याच्या चामड्यासह एका आरोपीला रंगेहात अटक केली.

Accused accused with leopard skin | बिबट्याच्या चामड्यासह आरोपी अटकेत

बिबट्याच्या चामड्यासह आरोपी अटकेत

नागपूर : वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भिवापूर येथे बिबट्याच्या चामड्यासह एका आरोपीला रंगेहात अटक केली. रणजितसिंग जुनी (३०) रा. कच्चेपार ता. सिंदेवाही असे त्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय दुसरा आरोपी श्रावण वाघमारे रा. भिवापूर हा फरार असून, वन अधिकारी त्याचा कसून शोध घेत आहे.
माहिती सूत्रानुसार आरोपी श्रावण वाघमारे हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे. त्यानेच सुमारे वर्षभरापूर्वी या बिबट्याची शिकार केली. तेव्हापासून तो चामडे विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात होता. अलीकडेच वन विभागाला त्याची चाहूल लागली. काही वन अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून वाघमारे याच्याशी संपर्क साधला. दरम्यान रणजितसिंग हाही संपर्कात आला. यानंतर चामडे खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला, आणि शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता भिवापूर येथे चामडे देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार नागपूरचे सहायक वनसंरक्षक रमेश खराबे यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक दुपारी २.३० च्या सुमारास नागपूरवरून खाजगी वाहनांनी भिवापूरकडे रवाना झाले. भिवापूर येथे पोहोचताच रणजितसिंग याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. त्याने लगेच भिवापूर येथील आयटीआयसमोर चामड्यासह पोहोचत असल्याचे सांगितले. त्यानुसार वन अधिकारी (बनावट ग्राहक) तेथे पोहोचले. काहीच वेळात रणजितसिंग चामड्यासह तेथे पोहोचला. यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन अटक केली. येथून त्याला वन विभागाच्या रेस्टहाऊसवर नेण्यात आले. तेथे त्याची प्राथमिक चौकशी करून झडती घेण्यात आली. दरम्यान आरोपी रणजितसिंगने त्याला मुख्य आरोपी श्रावण वाघमारे याने चामड्यासह पाठविल्याची कबुली दिली. यानंतर त्याला दक्षिण उमरेड वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची पुन्हा चौकशी करण्यात आली. दुसरीकडे या घटनेची नागपुरातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच, रात्री उशिरा दक्षिण उमरेड वन परिक्षेत्र कार्यालयाकडे धाव घेतली. ही कामगिरी एसीएफ रमेश खराबे व मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांच्या नेतृत्वात पारशिवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोसावी, आरएफओ ए. आर. शेख, वनपाल तायडे व वनपाल मसराम यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)

Web Title: Accused accused with leopard skin