Absconding accused of Seven Hills bar massacre in Nagpur arrested | नागपूरच्या सेवन हिल्स बार हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड
नागपूरच्या सेवन हिल्स बार हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड

ठळक मुद्देदोन वर्षांपासून देत होता गुंगारा : गुन्हे शाखेच्या पथकाने बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदऱ्यातील खळबळजनक सेवन हिल्स बार मधील हत्याकांडात कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेला कुख्यात गुंड तुषार दलाल याच्या अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या.
प्रॉपर्टी डीलर जीतू गावंडे याची तुषार दलाल आणि त्याच्या साथीदारांनी २०१३ मध्ये निर्घृण हत्या केली होती. सेवन हिल्स बारमध्ये हे हत्याकांड झाले होते. ते बारमधील सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांच्या हाती सीसीटीव्हीच्या रुपात सबळ पुरावा मिळाला होता. याच पुराव्याच्या आधारे न्यायालयाने या हत्याकांडाचा सूत्रधार तुषार दलाल, लच्छू फाये, कुणाल मस्के, भूपेश टिचकुले आणि समीर काटकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. आरोपी कारागृहात असताना मार्च २०१७ मध्ये २८ दिवसांच्या संचित रजेवर आरोपी तुषार दलाल कारागृहाबाहेर आला. त्याला ४ एप्रिलला कारागृहात परत जायचे होते. मात्र, तो फरार झाला. या प्रकरणात तुषारविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

नातेवाईकांच्या मोहात अडकला
गेल्या अडीच वर्षांपासून पोलीस त्याला शोधत होते तर तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी त्याच्या सर्व नातेवाईकांकडेही पोलिसांनी खबरे पेरले होते. सोमवारी सायंकाळी तो नंदनवनमधील नातेवाईकांना भेटण्यासाठी पोहचल्याचे कळताच गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या.

 

Web Title: Absconding accused of Seven Hills bar massacre in Nagpur arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.