आंदोलन नव्हे, संवादातून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल ; चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:44 IST2025-10-27T16:42:48+5:302025-10-27T16:44:21+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : शेतकरी व ओबीसींच्या हितासाठी शासन कटिबद्ध

A positive solution will soon emerge through dialogue, not agitation; Chandrashekhar Bawankule
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व घटकांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून, आंदोलनाऐवजी संवादातून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केले.
बावनकुळे म्हणाले, शेतकरी आंदोलनाबाबत बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि डॉ. अजित नवले यांच्याशी संवाद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. शासन या विषयांवर गंभीर असून, लवकरच सकारात्मक तोडगा निघेल. मुख्यमंत्री यांनी ४० ते ४५ ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. हैदराबाद गॅझेटमधील खऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रावर आधारित जीआर योग्य असून, त्यावर संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. खोटे प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होईल; पण खऱ्या कुणबींवर अन्याय होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदार यादी आरोपाबाबत बावनकुळे म्हणाले, काहीजण पराभव गृहीत धरून आधीच आरोप करत आहेत. हा निव्वळ राजकीय खोटारडेपणा आहे. ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून महायुती विजयी होईल. मतदार ठामपणे महायुतीसोबत आहे.
पंतप्रधानांना भेटण्यात काहीच गैर नाही
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एनडीएचे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यात काहीच गैर नाही, उलट महायुती अधिक मजबूत होत आहे. संजय राऊत हे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. धान नुकसानाबाबत पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.