नागपूर रेल्वे स्थानक; उपर से टामटूम, अंदर से रामजाने ! नागपूर रेल्वे स्थानकावर मोठा अपघात थोडक्यात टळला

By नरेश डोंगरे | Updated: July 22, 2025 20:33 IST2025-07-22T20:32:43+5:302025-07-22T20:33:10+5:30

फलाटाची 'मुंडेर' खचली : सुधार कार्य जोरात, जिर्ण भाग दुर्लक्षित

A major accident was narrowly avoided at Nagpur railway station. | नागपूर रेल्वे स्थानक; उपर से टामटूम, अंदर से रामजाने ! नागपूर रेल्वे स्थानकावर मोठा अपघात थोडक्यात टळला

A major accident was narrowly avoided at Nagpur railway station.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जागतिक दर्जाचं रेल्वे स्टेशन बनवण्याचा दावा करणाऱ्या नागपूररेल्वे स्थानकावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, ही विकास कामे करीत असतनाच जुन्या कामांना रंगपेंट मारून त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे सोमवारी घडलेल्या एका घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्यातून जागतिक दर्जाच्या दाव्याचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला असून 'उपर से टामटूम, अंदर से रामजाने' चीही प्रचिती आली आहे.

नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकाला १०० वर्षे पूर्ण झाली आहे. एकीकडे स्थानकाच्या शताब्दी महोत्सवाचे निमित्त साधून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. दुसरीकडे अमृत भारत योजने अंतर्गत शेकडो कोटींची कामे केली जात आहेत. मात्र, जुन्या कामांवर रंगपेंट करून नुसताच टामटूमचा दिखावा केला जात आहे. अशाच प्रकारे रंगपेंट मारलेल्या जुन्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या स्लॅबचे टोक (मुंडेर, गाडीत चढण्या-उतरण्याचा भाग) सोमवारी पहाटे खचले. सुदैवाने यावेळी गाडी फलाटावर उभी नव्हती. चुकून हा प्रकार गाडी फलाटावर येत असताना किंवा जाताना घडला असता तर स्लॅबचा भाग रुळावर पडून गाडी घसरण्याची किंवा त्या ठिकाणावरून प्रवासी गाडीत चढत किंवा उतरत असते तर मोठी घटना घडली असती.

डीआरएम धावले, दुरूस्तीही सुरू

रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत नागपुरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे साडेपाचच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्र. २ च्या इटारसी टोकावरील मुंडेर अचानक खाली कोसळली. या घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) विनायक गर्ग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तत्काळ तेथे धाव घेतली आणि तातडीने सुधारकाम सुरू करण्यात आले. काँक्रिटींग करून खाली सिमेंट ब्लॉक्सने आधार देण्यात आला.
 

उंदरांचा उपद्रव, धोक्याची घटना
प्लॅटफॉर्मच्या रुळांवर मोठमोठे उंदीर मुक्तपणे वावरताना दिसतात. त्यांनी कुरतडून अनेक प्लॅटफॉर्म खालून पोकळ केल्याची चर्चा आहे. अशात आता प्लॅटफॉर्म क्र. १, २ आणि ३ च्या मुंडेरही जीर्ण झाल्या असल्याने मोडकळीस आलेल्या आहेत. त्या 'मुंडेर'मुळे अपघाताचे सावट कायम असून त्या ठिकाणी प्रवाशांनी उभं राहणं म्हणजे जीवाशी खेळण्यासारखा प्रकार होऊ शकतो. सध्या नागपुरात सुरू असलेल्या बाबा ताजुद्दीन यांच्या उर्समुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे.

"प्लॅटफॉर्म फारच जुने असल्यामुळे आणि मुंडेरच्या भागात सळीचा वापर न झाल्यामुळे हा प्रकार घडला. मी स्वतः घटनास्थळी जाऊन तात्काळ सुधारकार्य सुरू केलं आहे. सुदैवाने कोणतीही गाडी यामुळे प्रभावित झाली नाही. स्टेशन पुनर्विकास प्रकल्पांतर्गत लवकरच सर्व प्लॅटफॉर्मचे नुतनीकरण करून ही त्रुटी दूर केली जाईल."
— विनायक गर्ग, विभागीय रेल्वे प्रबंधक, मध्य रेल्वे, नागपूर.

Web Title: A major accident was narrowly avoided at Nagpur railway station.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.