अंगावर काटा आणणारा व्हिडिओ.. बंद दाराला स्कार्फ बांधून त्यांनी केला प्रवास
By नरेश डोंगरे | Updated: March 30, 2026 17:19 IST2026-03-30T17:15:00+5:302026-03-30T17:19:09+5:30
Nagpur : भारतात सध्या रेल्वे नेटवर्क कमालीचे प्रशस्त होत असल्याचे दावे केले जात आहे. एकीकडे जागोजागी थर्ड फोर्थ लाईनचा विस्तार, नवनव्या सिग्नल सिस्टम, चकचकणाऱ्या, सॅटेलाईट रेल्वे स्टेशनची निर्मिती, एसी प्रतिक्षालये तसेच वायुवेगाने धावणाऱ्या आलिशान ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणल्या जात आहेत.

A heartbreaking video.. They traveled by tying a scarf to a closed door
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात सध्या रेल्वे नेटवर्क कमालीचे प्रशस्त होत असल्याचे दावे केले जात आहे. एकीकडे जागोजागी थर्ड फोर्थ लाईनचा विस्तार, नवनव्या सिग्नल सिस्टम, चकचकणाऱ्या, सॅटेलाईट रेल्वे स्टेशनची निर्मिती, एसी प्रतिक्षालये तसेच वायुवेगाने धावणाऱ्या आलिशान ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणल्या जात आहेत.
दुसरीकडे रोजगाराच्या शोधात निघालेले मजुरांचे लोंढे, पैसे आणि गाड्यांमध्ये जागाच नसल्याने टॉयलेटच्या बाजुला नाकतोंड दाबून प्रवास करताना दिसत आहे. हे कमी की काय म्हणून आता समाजमन सून्न करणारा एक व्हिडीओ सोशल मिडियावर आला आहे. या धक्कादायक व्हिडिओने भारतातील गर्दीच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करताना काही हतबल प्रवासी किती मोठा धोका पत्करतात, याकडे लक्ष वेधले आहे. डब्यात जागा न मिळाल्यामुळे आणि आतमधून दार बंद असल्याने अत्यंत गरिब दिसणाऱ्या दोन पुरुषांनी ट्रेनच्या बंद दरवाजाला स्वत:ला बांधून घेतल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
"Being poor is a crime." 💔
— Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) March 28, 2026
India claims to be fourth-largest economy, yet poor are forced to risk their lives on trains.
Passengers shut the doors and forced them
to travel while clinging to their gamchha just to earn a living in metro cities. Wake up, govt. pic.twitter.com/FXC2kS9lMm
विशेष म्हणजे, ज्या बंद दारात ते उभे झाले तेथे त्यांना अक्षरश: पाय ठेवायलासुद्धा जागा नाही. त्यांचे अर्धे पाय दाराबाहेर असून अशा स्थितीत ट्रेनमधून खाली पडू नये म्हणून त्यांनी गमछ्याने (स्कार्फ) स्वतःला दरवाज्याला बांधून घेतल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या हतबलतेची स्थिती स्पष्ट करणारा आणि पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा आहे. सुरजकुमार बुद्ध नामक तरुणाने त्याच्या एक्सवर हा व्हिडीओ व्हायरल करून "Being poor is a crime." 💔 ("गरीब असणे हा गुन्हा आहे." 💔) त्याला असे कॅप्शन दिले आहे.
सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने एकीकडे रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. दुसरीकडे गोरगरिब जनता थेट मृत्यूच्या दारात उभे राहून रेल्वेत प्रवास करतात, त्याचाही प्रत्यय आणून दिला आहे.