नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन केल्यास मधुमेही अंध होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:45 IST2024-04-29T18:42:38+5:302024-04-29T18:45:39+5:30
डॉ. हिमांशू मेहता : विदर्भ आॅप्थॅल्मिक सोसायटीचे पदग्रहण

Eye Car tips by an ophthalmologist
नागपूर : भारत मधुमेहाची राजधानी झाली आहे. देशात मधुमेह हे अंधत्वाचे सर्वात मोठे कारण म्हणून पुढे आले आहे. यामुळे मधुमेहींनी वेळोवेळी नेत्ररोग तज्ज्ञानाकडून तपासणी करून घ्यावी. त्यांच्या सल्ल्याचे पालन केल्यास मधुमेही अंध होणार नाही, असे मत मुंबईतील ज्येष्ठ रेटीना सर्जन व बॉलिवूड सेलिब्रिटींच्या डोळ्यांवर उपचार करणारे डॉ. हिमांशू मेहता यांनी नागपुरात व्यक्त केले.
आॅप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी डॉ. कृष्णा भोजवानी यांनी अध्यक्षपदाची तर डॉ. सौरभ मुंधडा यांनी सचिवपदाची सुत्रे हाती घेतली. डॉ. मेहता म्हणाले, मुधमेहबाधितांसाठी नियमीत तपासणी, वेळेवर उपचार महत्त्वाचा ठरतो. याकडे दुर्लक्ष केल्यास अंधत्वाचा धोका वाढतो.
-मधुमेहिंसाठी घरी करता येणारी
डॉ. मेहता यांनी मधुमेहिंसाठी घरी करता येणारी साधी चाचणी सांगितली. ते म्हणाले, टीव्ही पाहताना, एक डोळा झाकून घ्या आणि स्क्रीनवरील मजकूर वाचण्याचा प्रयत्न करा. दुसºया डोळ्याने पुन्हा हेच करा. वाचण्यात कोणतीही अडचण आली, तर नेत्ररोग तज्ज्ञाना भेटा. ही चाचणी डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यास आणि दृष्टी टिकवून ठेवण्यास सक्षम करते.
-आयुष्यभर चांगली दृष्टी ठेवणे सहज शक्य
आधुनिक तंत्रज्ञानामुळे आयुष्यभर चांगली दृष्टी ठेवणे सहज शक्य झाले आहे.. अगदी वयाशी संबंधित ‘मॅक्युलर डीजनरेशन’ (एआरएमडी) ज्यावर एकेकाळी उपचार करता येत नव्हते, त्यावर आता अॅडव्हान्स इंजेक्शनमुळे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते. जर जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला वृद्धापकाळात अंधत्व आले असेल, तर तुमचा डोळयातील पडदा तपासा आणि ४५ ते ५०व्या वर्षांच्या वयात प्रतिबंधात्मक इंजेक्शन्सचा विचार करा, असा सल्लाही डॉ. मेहता यांनी दिला.
-जास्त स्क्रीन टाईममुळे दूरदृष्टी होते कमी
जास्त स्क्रीन टाईममुळे लहान मुलांची दूरदृष्टी कमी होत आहे. हे टाळण्यासाठी त्यांचा स्क्रीन टाईम कमी करा. त्यांना खेळण्यासाठी मैदानात पाठवा.
-मोतीबिंदू पिकण्याची वाट पाहणे अनावश्यक
पूर्वी मोतीबिंदू पिकण्यासाठी वाट पहायला सांगितले जात होते. परंतु आता वाट पाहण्याची गरज नाही. आधुनिक लेसर शस्त्रक्रिया आणि मल्टीफोकल लेन्समुळे सामान्य दृष्टी परत मिळविणे शक्य झाले आहे.
-‘स्माइल’मुळे दृष्टी समस्या सुधारते
पुण्याचे डॉ. वर्धमान कांकरिया म्हणाले, ‘स्मॉल इन्सिजन लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन’ (स्माइल) हे एक नवीन लेसर नेत्र शस्त्रक्रिया आहे, जी दूरदृष्टी, आणि दृष्टिवैषम्य यांसारख्या दृष्टी समस्या सुधारते. ‘ड्राय आय सिंड्रोम’असलेल्या रुग्णामध्ये ही उपचारपद्धती प्रभावी ठरते.